लोकमान्य टिळकांनी देव्हाऱ्यातील गणपतीला उत्सवाचं स्वरूप दिलं असं म्हणत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण गणेशोत्सवात पुण्यात येऊन मानाच्या पाचही गणपतींचं दर्शन करणार असल्याचंही पुण्यात जाहीर केलं. आपल्या संपूर्ण भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भाऊ रंगारी आणि टिळक’ या वादावर भाष्य करणं टाळलं.

गणेशोत्सव हा फक्त धार्मिक नाही तर तो सामजिक उत्सव आहे २०२२ मध्ये आपला भारत हा नवभारत असणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे त्या दृष्टीनं गणेशोत्सवात काय देखावे सादर करता येतील याकडे मंडळांनी लक्ष द्यावं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गणेशोत्सव काळात पुण्यातल्या काही मंडळांमधील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले असतात, ते मागे घेण्यात यावे अशीही मागणी सातत्यानं होत असते, यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की गणेश मंडळं आणि कार्यकर्ते आपलेच आहेत त्यांच्याशी प्रेमानं वागा. मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना सल्ला देताच कार्यकर्त्यांनी शिट्ट्या वाजवून मुख्यमंत्र्यांना दाद दिली. मात्र त्याचवेळी तुम्हीही कायद्यानं वागा असा सल्ला कार्यकर्त्यांना द्यायला मुख्यमंत्री विसरले नाहीत.

पुण्यातल्या गणेशोत्सवाचं हे शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी वर्ष आहे, त्यानिमित्तानं पुणे महापालिकेच्या वतीनं शनिवार वाड्याच्या प्रांगणात एका महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री बैलगाडीतून आले तेव्हा ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमात ढोल वाजविण्याचा मोह मुख्यमंत्र्यांनाही आवरला नाही.

 

आज झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ढोल वाजवताना

 

या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट,पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला,महापौर मुक्ता टिळक,उपमहापौर सिद्धार्थ धेंडे,स्थायी समिती अध्यक्ष मुरूलीधर मोहोळ,सभागृह नेते श्रीनाथ भिमाले,महापालिका आयुक्त कुणाल कुमार,जिल्हाधिकारी सौरभ राव आणि महापालिकेतील सर्व पक्षीय उपस्थित होते.

पुण्यात वाद होत असतात टेन्शन घेऊ नका
लोकमान्य टिळकांपासुन भाऊ रंगारींपर्यंत अनेकांचं गणेशोत्सवामध्ये योगदान असून पुण्यात चर्चा, वाद सुरुच असतात.  या वादांचं टेन्शन मुख्यमंत्र्यांनी घेऊ नये.आम्ही गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करू.अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांना पालकमंत्री गिरीश बापट यांनी देत वादावर पडदा टाकण्याचे काम केले.

यावेळी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की,सार्वजनिक गणोशोत्सवाचे जनक कोण त्याचप्रमाणे कुणाचा फोटो लावायचा आणि कुणाचा नाही. यावरून गेले काही दिवस सुरु असलेल्या वादाला पूर्णविराम देऊया. तसेच गणेशोत्सव असो वा शिवजयंती हे उत्सव सुरु करण्यामध्ये लोकमान्य टिळक आणि त्यांच्या तत्कालिन सहकार्यांचं योगदान मोठं असून भाऊ रंगारी गणपती मंडळानं सामाजिक कार्य समजून या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.