राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारही नाही आणि शरद पवारही नाही तर आमच्या घरातून मीच लोकसभा निवडणूक लढणार असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. लोकांना लढण्याची इच्छा आहे आणि हे पक्षासाठी खरंच चांगलं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. पार्थबाबतची चर्चा मी फक्त प्रसारमाध्यमांमध्ये पाहिली. घरात किंवा पक्षाच्या बैठकीत पार्थबद्दल काहीही चर्चा झाली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. सगळ्या जागा कुटुंबातल्या लोकांनी घेतल्या तर कार्यकर्त्यांचं काय होणार? त्यामुळे लोकसभेसाठी आमच्या घरातून एकच इच्छुक आहे आणि ती मी आहे असंही त्यांनी सांगितलं.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली त्याचवेळी त्यांनी ही आपली भूमिकाही स्पष्ट केली. उदयनराजेंच्या विरोधाबाबत विचारलं असता त्या म्हटल्या की कोणी कोणाला विरोध केला हे माहित नाही. उदयनराजेंबद्दलची चर्चा कानावर आली नाही. आम्ही तिकिटं कोणावरही लादणार नाही. कार्यकर्त्यांच्या भावना पाहून मग निर्णय घेतला जाईल. बैठकींचा पहिला टप्पा झाला आहे अजून बैठका बाकी आहेत असंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं.
ठाण्यात घडलेल्या चिमुकलीसोबतच्या अश्लील चाळ्यांच्या घटनेचाही त्यांनी तीव्र निषेध केला. वर्दीची भीती लोकांच्या मनात राहिली पाहिजे, या प्रकरणात कोणीही राजकारण करू नये. समाज म्हणून अशा प्रवृत्तींमध्ये बदल घडवला गेला पाहिजे कायद्याचा धाक हवा तर अशा घटना घडणार नाहीत. मात्र ठाण्यात घडलेल्या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडा आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 8, 2018 4:34 pm