सौरभ राव यांची ग्वाही ; महापालिका आयुक्त म्हणून आज रुजू होणार

नुकत्याच एका सर्वेक्षणामध्ये देशात पुणे आणि हैद्राबाद या शहरांना वास्तव्यास अनुकूल (मोस्ट लिव्हेबल सिटी) असा दर्जा मिळाला आहे. परंतु, वाहतूककोंडी, विकास आराखडय़ाप्रमाणे रस्त्यांचे विस्तारीकरण, ठोस उपाययोजनांद्वारे रस्ते प्रशस्त करण्यातील उणिवा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असे विविध प्रश्न असल्याने प्रत्यक्षात या शहरांमध्ये तशी स्थिती नाही. त्यामुळे या प्रश्नांवर भर देऊन पुणे शहराचे जीवनमान अधिकाधिक उंचावण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मावळते जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सोमवारी दिली. राव यांची पुणे महापालिका आयुक्त म्हणून बदली झाली असून आयुक्तपदाचा कार्यभार ते मंगळवारी (१७ एप्रिल) स्वीकारणार आहेत.

जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाने सोमवारी काढले असून त्यांची पुणे महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर राव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या चार वर्षांंत जिल्हाधिकारी म्हणून केलेले काम, महापालिका आयुक्त म्हणून प्राधान्याने करण्यात येणारी कामे यांबाबत त्यांनी भाष्य केले.

राव म्हणाले, गेली चार वर्षे पुण्यात समाधानकारक कामे करता आली. अनेक नवीन गोष्टी जिल्ह्य़ात करू शकलो. परस्पर सहकार्याची भूमिका ठेवत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे महापालिका यांच्याबरोबर जिल्हा प्रशासनाने नेहमीच समन्वय ठेवून विकासकामे मार्गी लावली.

महापालिका आयुक्त म्हणून मंगळवारी पदभार स्वीकारणार आहे, असे सांगून राव म्हणाले, आयुक्त म्हणून दैनंदिन प्रशासनावर भर दिला जाईल.  शहराला अधिकाधिक राहण्यायोग्य करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याची आवश्यकता असते. विकास आराखडय़ाची अंमलबजावणी, वाहतूककोंडी असे अनेक विषय कमी-जास्त प्रमाणात त्रुटी राहिल्याने त्याचा शहर आणि पर्यायाने नागरिकांना त्रास होत आहे. शहराची वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीसाठीचे काम मेट्रोबरोबर संयुक्तरीत्या करू. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जोवर सक्षम होत नाही, तोवर शहराचा जीवनमान उंचावण्याचा आलेख (लिव्हेबिलिटी इंडेक्स) वाढवता येणार नाही. नदीसुधार प्रकल्प आपल्यासमोरील मोठे आव्हान आहे, शहराची जमिनीखालील सांडपाण्याची वाहिनी जुनी झाली आहे, त्यामुळे हा देखील मोठा महत्त्वाचा विषय आहे. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावात आधारभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, हेदेखील मोठे आव्हान आहे. समाविष्ट गावाच्या अपेक्षांनुसार दर्जेदार नागरी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, असे अनेक विषय आयुक्त म्हणून प्राध्यान्याने हाती घेऊ.

जिल्हाधिकारी राव यांची कामगिरी

सन २०१४ मध्ये पावसामुळे दरड कोसळून उद्ध्वस्त झालेल्या माळीण गावाचे आमडे येथे आठ एकर जागेत पुनर्वसन करण्यात आले. सरकार, सामाजिक संस्था आणि समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहाय्याने गावाचे पुनर्वसन करण्यात आले. यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून राव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ परवानगीसाठी त्यांनी सातत्याने संरक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता. तसेच मागील वर्षी शहर आणि जिल्ह्य़ात ठप्प झालेली आधार यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी त्यांनी कसोशिने प्रयत्न केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाली. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कामाबाबत राज्य शासनाकडून जिल्ह्य़ाचा गौरव करण्यात आला आहे.