शहरात पथारीवाल्यांवरील कारवाई अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सुरू असताना पथारीवाल्यांच्या नोंदणीतही मोठे घोळ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पथारीवाले नोंदणीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर शेकडो बनावट व्यावसायिकांनी तात्पुरते धंदे सुरू करून महापालिकेचे ओळखपत्र मिळवण्याचा प्रयत्न केल्याची वस्तुस्थितीही उघड झाली आहे.
शहर फेरीवाला समिती स्थापन झाल्यानंतर समितीने पथारीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी पहिल्या टप्प्यात पथारीवाले व रस्त्यावरील व्यावसायिकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पथारीवाल्यांचे अर्ज भरून घेणे, व्यवसायाच्या जागेवर जाऊन त्यांचे सर्वेक्षण करणे, व्यवसाय करत असताना चित्रीकरण करणे आदी प्रक्रिया राबवण्यात आल्या. त्यानुसार आतापर्यंत सुमारे वीस हजार पथारीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पथारीवाल्यांच्या या सर्वेक्षण अहवालाचे मुख्य सभेपुढे विभागवार सादरीकरण करावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत असली, तरी ती मान्य करण्यात आलेली नाही.
सर्वेक्षणाचा हा अहवाल बघितल्यानंतर अनेक नगरसेवकांना त्यांच्या भागाची माहिती नव्याने समजत आहे. त्यांच्या प्रभागात ज्या ज्या ठिकाणी जेवढे व्यावसायिक सध्या व्यवसाय करत आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट, तिप्पट व्यावसायिकांचे सर्वेक्षण झाल्याचे अहवालात दिसत आहे. तसेच ज्या भागात आजपर्यंत कधीही पथारीवाले वा स्टॉल नव्हते त्या ठिकाणी देखील व्यावसायिक व्यवसाय करत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळेच स्थानिक नगरसेवकांनी या अहवालावर अनेक आक्षेप  घेतले असून हे व्यावसायिक आले कोठून, असा प्रश्न अधिकाऱ्यांना आणि सर्वेक्षण करणाऱ्यांना नगरसेवक विचारत आहेत.
अनेक प्रभागातील नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात जेवढे व्यावसायिक आहेत त्यापेक्षा कितीतरी जादा व्यावसायिक सर्वेक्षण अहवालात दाखवण्यात आल्याची तक्रार केली आहे. प्रभाग क्रमांक ६४ चे नगरसेवक श्रीनाथ भिमाले म्हणाले की, माझ्या प्रभागात सॅलिसबरी पार्क आणि परिसरात कधीही पथारी व्यावसायिक नव्हते. मात्र तेथेही पथारी व्यावसायिक असल्याचे अहवालात दाखवण्यात आले आहे. येरवडय़ातील अनेक व्यावसायिक माझ्या प्रभागात दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वेक्षणाचा संपूर्ण अहवालच चुकीचा आहे. भाजपचे गटनेता गणेश बीडकर यांनी सांगितले की सोमवार पेठ शाहू उद्यान परिसरात जेथे शंभर देखील व्यावसायिकांसाठी जागा नाही, तेथे एकशे चौऱ्याहत्तर व्यावसायिक दाखवण्यात आले आहेत. एवढय़ा व्यावसायिकांना तेथे जागाच उपलब्ध नाही, तर ते आले कोठून हा प्रश्न आहे. पथारी व्यावसायिकांना ओळखपत्र मिळणार आहे हे जाहीर झाल्यानंतर शेकडो जणांनी सर्वेक्षणापुरताच व्यवसाय सुरू केला होता आणि अशांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणीकृत व्यावसायिकांची संख्या वीस हजारांवर गेली असली, तरी ती खरी नाही असा मुख्य आक्षेप आहे.
अहवालाची छाननी होणे आवश्यक
पथारीवाले सर्वेक्षणाचा अहवाल विश्वासार्ह नाही. त्याची छाननी होणे आवश्यक आहे. शेकडो बनावट व्यावसायिक या अहवालात दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकृत पथारीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी देखील ही छाननी आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाने अहवालाची छाननी करून अहवाल मुख्य सभेपुढे सादर करावा आणि त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी.
– गणेश बीडकर, गटनेता, भाजप