आनंद सराफ

पुण्यातील गावठाणांची भ्रमंती करताना वानवडीचे ठळक वैशिष्टय़ दिसते ते म्हणजे हे आपल्या देशाचे प्रातिनिधिक रूप वाटते. देशातील बहुतेक सर्व प्रांतीय या भागात आहेत. जाती-धर्मापलीकडचे एकोप्याचे वातावरण इथे प्रत्ययास येते. सर्वाचे सणवार, एकत्रित उत्साहाने साजरे होतात. सारे जहाँसे अच्छा हे गीत किंवा पुस्तकातील पहिल्या पानावरील प्रतिज्ञेचा अर्थ येथील जनजीवनात समजतो!

पारंपरिक गावगाडा हाकणारे पूर्वीचे वानवडी गाव, पेशवाई काळात महादजी शिंदे आणि त्यांच्या सैन्याचा तळ असलेले म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचे सरदार आणि सैनिक यांचा कुटुंब कबिला येथेच स्थिरावला. महादजींच्या निधनानंतर त्यांच्या वंशजांनी शिंदे छत्री या भव्य स्मृतिस्थळाची उभारणी केली. छोटेखानी मंदिराभोवती पुढील काळात भव्य राजेशाही सभागृहाची उभारणी करण्यात आली. या सर्व वास्तूचे व्यवस्थापन सिंदिया देवस्थान ट्रस्ट ग्वाल्हेर यांचेकडे आहे. येथून जवळच ग्वालियर पॅलेसची पुरातन वास्तू आहे.

वानवडीची दुसरी महत्त्वाची ओळख म्हणून अपंग कल्याणकारी संस्थेची ओळख आहे. १९५६ साली शासनाने दिलेल्या साडेतीन एकर जमिनीवर संस्थेची उभारणी झाली. सुमारे अडीचशे निवासी विद्यार्थी असून, त्यांचे शिक्षण, रोजगार प्रशिक्षण, वैद्यकीय सोयी-सुविधा कला, क्रीडा, विकास उपक्रम असे सर्व काही याच संस्थेत होते.

राज्य राखीव पोलीस दलाची वसाहत, वानवडीचे मानाचे पान आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात इंग्रजांनी सैन्यदलाच्या वसाहती या लोकवस्तीपासून अलिप्त ठेवल्या होत्या. त्या काळातील वसाहतीमध्ये स्वातंत्र्योत्तर काळात १९४८ मध्ये राज्य राखीव पोलीस दल वसाहत निर्माण झाली. एसआरपीएफच्या दोन हजार जवानांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची ही वसाहत आहे.

इंग्रजी राजवटीत पुण्याची लष्करी केंद्र म्हणून देशभरात ओळख होती. स्वातंत्र्योत्तर काळात हीच ओळख आणि संबंधित वास्तू आस्थापने, प्रकर्षांने विकसित झाली. वानवडीतील कमांड हॉस्पिटल, एएफएमसी आणि कृत्रिम अवयव केंद्र येथे अद्ययावत उपचारांच्या प्रशिक्षणाच्या सोयी-सुविधा केवळ सैनिकांसाठीच नव्हे तर इतर नागरिकांसाठीसुद्धा उपलब्ध आहेत. एएफएमसीच्या मुख्य व्यवस्थापकपदी सध्या मेजर जनरल माधुरी कानिटकर आहेत.

सर्वधर्मीय लोकांचे शांतताप्रिय जीवन हे वानवडीचे वैशिष्टय़ आहे. कोणत्याही गावात सहसा न आढळणाऱ्या सर्वधर्मीय स्मशानभूमी, स्वतंत्र स्वरूपात या छोटय़ा गावी आढळतात. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, बोहरी अशा स्वतंत्र स्मशानभूमी सोयी-सुविधा स्वच्छतेसह या परिसरात आहेत. इंग्लंडच्या राणीने पुण्यात मृत्यू पावलेल्या ख्रिस्ती सैनिकांसाठी १९२२ ते १९२६ या काळातील खास उभारलेली स्मशानभूमी वानवडीतच आहे. चापेकर बंधूंनी हत्या केलेल्या रँडचे थडगे येथेच असल्याची माहिती मिळाली.

सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी तयार केलेले उद्यान, कालांतराने तेथे जोपासलेले दुर्मीळ वृक्ष, बदलत्या काळात तेथेच उभारलेले पर्यावरण संशोधन केंद्र असा सारा प्रवास एम्प्रेस गार्डनने अनुभवला आहे. अ‍ॅग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना १८३० साली मुंबईच्या तत्कालीन गव्‍‌र्हनरच्या पुढाकाराने झाली. या संस्थेने कार्यक्षेत्र वाढवून १८९२ मध्ये एम्प्रेस गार्डनची निर्मिती केली. आता १९९८ पासून या बागेचे व्यवस्थापन पुणे मनपाकडे आहे. बागेचा विस्तार एकूण ६० एकर जमिनीवर असून, दुर्मीळ वृक्ष संगोपनासह इथे प्रतिवर्षी फळाफुलांच्या प्रदर्शनासह माहितीपूरक कार्यशाळा घेतल्या जातात.

वीरस्मृती ही वसाहत वानवडी बझार येथे १९६८ साली उभारण्यात आली आहे. १९६२ च्या चीन युद्धामध्ये बेपत्ता झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दिलासा आणि सन्मान म्हणून चोवीस जणांना इथे सामावून घेण्यात आले आहे. वीरस्मृती ही केवळ वसाहत नसून सैन्यदलाच्या आणि देशवासीयांच्या कृतज्ञतेचे ते प्रतीक आहे.

वानवडीच्या मूळ गावठाणात भ्रमंती करताना आता कौलारू घरे अभावानेच दिसतात. वरची, खालची आणि मधली आळी असे गावठाणाचे मुख्य तीन भाग आहेत. जांभूळकर, जगताप, केदारी, गवळी, घाडगे, होले, चौगुले, देडगे, शिवरकर, गिरमे, कचरे, लडकत ही घराणी मूळचे जमीनदार आहेत. भैरवनाथ, मारुती, विठ्ठल, राम, काळूबाई, तुळजा भवानी, अंबामाता, महादेव, जैन मंदिर, झुलेलाल ही देवस्थाने या परिसरात आहेत. सेंट पॅट्रिक चर्चची भव्य वास्तू लक्षवेधी आहे. रामनवमीच्या सुमारास गावातून शिखर शिंगणापूरला कावड जाऊन वाजतगाजत परत येते. गावठाण आणि परिसरात वारकरी पंथीय मंडळी बहुसंख्येने असून भजनी मंडळे, काकड आरती, पारायण सप्ताह, आषाढी वारीचे आदरातिथ्य असे अनेक उपक्रम पिढय़ानपिढय़ा चालत आहेत.

वानवडीची सध्याची वस्ती, आता सव्वालाखाचे आसपास आहे. रेसकोर्स, जांभूळकर मळा, भैरोबा नाला, गवळी घाडगेनगर, एआयपीटी, एसआरपीएफ, साळुंके विहार रस्ता, आझादनगर, केदारीनगर, बोराडेनगर, नेताजीनगर, शिंदे छत्री, ग्वालियर पॅलेस, वानवडी बझार आणि कमांड हॉस्पिटल या परिघात वानवडीचे विस्तारित क्षेत्र सामावले आहे. विकासाचा विचार करता प्रतिष्ठित बुजुर्गाची नावे महत्त्वाची आहेत. विठ्ठलराव शिवरकर, मोतीलाल मधुरावाला, लक्ष्मणराव पाटील (जगताप), नारायणराव कचरे, विठ्ठलराव भुजबळ, महादू खांदवे, श्रीपतराव जांभूळकर ही नावे समजली. नव्या पिढीचा विचार करता माजी महापौर प्रशांत जगताप, अ‍ॅड. मुरलीधर कचरे, शिवाजी केदारी, महेश पुंडे, दिनेश होले, शंभू जांभूळकर, शाम चव्हाण इ. नावे समजली. वानवडीसंबंधीच्या या लेखनासाठी रघुनाथराव (नाना) कचरे, बाळासाहेब शिवरकर, सुरेश पिंगळे, श्रीधर पंत तांबोळकर, विष्णू बधे, सुनील वाळूंज, बनेश जठार, मंदार लवाटे यांनी दिलेल्या माहिती संदर्भाचा उल्लेख करायला हवा.