राज्य सरकार शिक्षकांची २४ हजार रिक्त पदं मागील कित्येक वर्षांपासून भरत नाही. यासाठी जाहिरातच काढली जात नाही. हीच बाब प्रकाशात आणत पुण्यात शिक्षकांनी उपोषण आंदोलन सुरु केलं आहे. तसंच उपोषणाची दखल मागील सहा दिवसांपासून न घेतली गेल्याने आता या शिक्षकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

मागील कित्येक वर्षापासुन राज्य सरकार शिक्षकांची २४ हजार रिक्त पदांसाठी जाहिरात काढण्यास तयार नाही. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर मागील सहा दिवसापासून डीएड-बीएड स्टुडंट्स असोसिएशन च्या संघटनेच्या माध्यमातून शिक्षक उपोषणास बसले आहेत. तरीही या उपोषण आंदोलनाची दखल सरकारकडून घेतली जात नाही. याचमुळे शिक्षकांनी आक्रमक होत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. सोमवारपर्यंत सरकारने जाहिरात न काढल्यास आत्मदहन करू असे शिक्षकांनी म्हटले आहे.

यावेळी परमेश्वर इंगोले पाटील म्हणाले की, शिक्षकांची भरती लवकरात लवकर झाली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही कित्येक वर्षांपासून लढा देत आहोत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी देखील अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. त्यानंतर अखेर आम्ही आमरण उपोषण आंदोलनाचं अस्त्र उगारलं असून या सहा दिवसाच्या कालावधीत कोणीही संपर्क साधला नाही. पाच आंदोलकांची तब्बेत खालावली त्यांना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आलं. आता सोमवार पर्यंत सरकारने २४ हजार शिक्षक रिक्त पदा च्या जागांसाठी जाहिरात न काढल्यास आम्ही आत्मदहनाचा इशारा दिला आहे.