पाण्याच्या नियोजनासाठी आज पालिकेमध्ये बैठक
मान्सूनचे आगमन एक आठवडय़ापेक्षा अधिक लांबल्यास पाणीकपातीमध्ये वाढ करून शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहराच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी महापौरांनी महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी (१४ जून) बैठक बोलाविली आहे.
राज्यामध्ये मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. मान्सून सक्रिय होण्यासाठी किमान आठवडय़ाभराचा कालावधी अपेक्षित आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २.१५ अब्ज घनफूट (टीएमसी) इतका पाणीसाठा असून हे पाणी किमान दीड महिना पुरेल एवढे आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठय़ाचा आढावा घेऊन शहराच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यापूर्वी हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मान्सूनच्या प्रगतीचा आढावा घेणार असल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती आणि धरणातील उपलब्ध पाणीसाठा ध्यानात घेऊन सध्या शहराला दिवसाआड एकवेळचा पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये पावसाचे आगमन एक आठवडय़ापेक्षा अधिक काळ लांबणीवर पडले तर शहरामध्ये दोन दिवसांआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मंगळवारच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे.