सहकारी बँका संचालक मंडळाच्या बेपर्वाईमुळे बंद पडतात, असे मत महाराष्ट्र अर्बन बँक फेडरेशनचे अध्यक्ष बाळासाहेब अनास्कर आणि ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांनी व्यक्त केले.
 दि विश्वेश्वर सहकारी बँकेच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व सहकारी संस्थांचे निबंधक मधुकरराव चौधरी, अनास्कर आणि संगोराम यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष सुनील रुकारी, सरव्यवस्थापक चिंतामणी वैजापूरकर आणि संचालक अनिल गाडवे उपस्थित होते.
अनास्कर म्हणाले, ‘सहकारी बँका संचालक मंडळाच्या हेव्यादाव्यांमुळे अडचणीत येतात. विश्वेश्वर बँकेच्या प्रगतीचे श्रेय बँकेच्या संचालक मंडळाला जाते.’ बँकिंग क्षेत्रात नवे बोधचिन्ह गाजेल, अशी आशाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. ‘बँक राष्ट्रीय संपत्ती निर्माण करत असते. विश्वेश्वर बँकेच्या संचालक मंडळाने हे ध्यानात ठेवले त्यामुळेच बँकेची प्रगती झाली. सहकारी बँक प्रत्येक माणसाला ओळखते. व्यवहाराला माणुसकीचा झरा असणे आवश्यक आहे,’ असे मत संगोराम यांनी व्यक्त केले. बँकेने रिझर्व बँक ऑफ इंडियाने ठरवलेले नियम पाळले आहेत. आरबीआयचा ‘अ’ दर्जा कायम राखला आहे. शिस्तीमुळेच हे शक्य झाले, असे मत चौधरी यांनी व्यक्त केले. समाजाला बँकेच्या विकासाचा फायदा व्हावा, अशी आशाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.