फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्यावर्षी झालेल्या बॉम्बस्फोटानंतरही पोलिसांनी काहीच धडा घेतल्याचे चित्र गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई करून पकडलेली वाहने फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक दिवस धूळ खात पडलेली आहेत. बेवारस वाहनांसारखी ही वाहने पडली असून हा परिसर मोठय़ा गर्दीचा असूनही या वाहनांकडे पोलिसांचेच लक्ष नाही, अशी परिस्थिती आहे.
फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात १० जुलै २०१४ रोजी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या हस्तकांनी दुचाकीच्या डिकीत स्फोटके पेरून स्फोट घडविला होता. या स्फोटात एका महिलेसह दोघे जण जखमी झाले होते. पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवून दहशतवाद्यांनी एकप्रकारे पोलिसांना आव्हान दिले होते. या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाने केला. तेव्हा दहशतवाद्यांनी स्फोट घडविण्यासाठी वापरलेली दुचाकी ही सातारा न्यायालयाच्या आवारातून चोरल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट झाल्यानंतर या परिसरात नागरिकांना दुचाकी लावण्यास मनाई करण्यात आली. तेथे सुरक्षेसाठी चौकीही उभारण्यात आली. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांचा नाव, पत्ता नोंदवून मगच त्यांना आत प्रवेश दिला जाऊ लागला. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनाही तेथे वाहने लावण्यास मनाई करण्यात आली.
आवारात वाहने लावण्यासाठी मनाई करण्यात आल्यामुळे शेजारी असलेल्या मजूर अड्डय़ाच्या जागेत पोलिसांनी वाहने लावण्यास सुरुवात केली. त्या पाठोपाठ गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईत पकडलेली वाहने फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यास सुरुवात केली आहे. जे वाहनचालक दंड भरुन वाहन नेण्यासाठी येत नाहीत, अशा वाहनचालकांची वाहने या भागात अडगळीत पडली आहेत. अडगळीत पडलेल्या या वाहनांचा वापर घातपाती कारवायांसाठी होऊ शकतो, याचे भान वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना नाही, अशी तक्रार काही पोलीस कर्मचाऱ्यांनीच दै. ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.

नियमन बाजूला, दंडवसुली मात्र जोरात
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोठय़ा संख्येने बाहेरगावाहून नागरिक येतात. शिवाजी रस्ता हा मध्य वस्तीतील गजबजलेला रस्ता आहे. अशा मोठी गर्दी असलेल्या बुधवार चौकात वाहतुकीचे नियमन करण्याऐवजी वाहतूक शाखेचे कर्मचारी दंडवसुलीवरच भर देताना दिसतात. वाहनचालकांना पकडल्यानंतर त्यातील काही जणांकडे दंड भरण्याएवढी रक्कम नसते. अशा वेळी वाहनचालकांची वाहने थेट फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावली जातात. मात्र संबंधितांनी न नेलेली, नो पार्किंगमधून उचलून आणलेली अनेक वाहने या भागात कित्येक महिने पडून आहेत.