करोना व्हायरस या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने सोशल डिस्टंसिंगचा वापर करावा, असे आदेश दिलेले असताना देखील आज पुणे महापालिकेत शहरी गरीब योजनेच्या रांगेत सोशल डिस्टंसिंगच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे पहावयास मिळाले.

जगभरात सध्या करोना व्हायरसने एक प्रकारे दहशत निर्माण केलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक देश विशेष दक्षता घेत आहे. आपल्या देशात देखील करोना व्हायरस या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेच्या आदेशानुसार देण्यात आलेल्या सूचनाचं नागरिकांनी पालन करावे, असं प्रत्येक ठिकाणी प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र नागरिकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

पुणे महानगरपालिकेच्या इमारतीधील आरोग्य विभागाच्या कार्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावर शहरी गरीब योजनेच्या लाभार्थींनी सकाळी 11 वाजेपासून गर्दी केली होती. शहराच्या अनेक भागातून तरुण वर्गांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जवळपास शंभरच्या आसपास नागरिक होते. मात्र यामध्ये नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचा वापर केला नाही. सर्वजण अगदी एकमेकांच्या जवळ येऊन थांबले होते. शिवाय प्रशासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचे देखील याकडे लक्ष नसल्याचे दिसून आले. यामुळे पुणे महानगरपालिकेकडूनच सोशल डिस्टंसिंगच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे पाहण्यास मिळाले.

आणखी वाचा- तबलिगी मर्कझ: पुण्यातील ९२ लोकांचा कार्यक्रमात सहभाग, काहींवर उपचार सुरु – महापौर

याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारणा केली असता त्यांनी  अतिरिक्त आयुक्त,  आरोग्य अधिकारी यांना चांगलेच सुनावले. आपण गर्दी करू नका असे एका बाजूला सांगत आहोत आणि दुसर्‍या बाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक एकाच ठिकाणी जमत असल्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आता यापुढे शहरी गरीब योजनेच्या लाभार्थी व्यक्तीना जुन्या कार्डवर शहरातील रुग्णालय प्रशासनाने उपचार करावे. कोणत्याही व्यक्तीकडे चालू आर्थिक वर्षाचे कार्ड नाही, म्हणून उपचारास नकार देऊ नये. असे आदेश प्रशासनाला त्यांनी दिले.