देशातील विद्यापीठांतील २५ अभ्यासक्रमांनी जगातील शंभर अभ्यासक्रमांमध्ये स्थान मिळवले आहे. तसेच तीन आयआयटींनी जगातील पहिल्या शंभर अभियांत्रिकी संस्थांमध्ये स्थान मिळवले असून, त्यात आयआयटी मुंबई ४९ व्या स्थानी आहे.

‘क्यूएस’ विषयनिहाय जागतिक विद्यापीठ क्रमवारी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते गुरुवारी जाहीर करण्यात आली. जगभरातील ५१ विद्याशाखांतील अभ्यासक्रमांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यात रसायनशास्त्र, पेट्रोलियम, विधी, कला, अभियांत्रिकी आदींचा समावेश आहे. शैक्षणिक प्रतिष्ठा, रोजगारक्षमता, संशोधन परिणाम आणि संस्थेतील संशोधक प्राध्यापकांची उत्पादकता या चार प्रमुख निकषांवर संस्थांचे मूल्यांकन करण्यात आले. कला आणि मानव्यता शाखेत ऑक्सफर्ड विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेतील पहिले तीन क्रमांक मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि केंब्रिज विद्यापीठाने मिळवले आहेत. आरोग्यशास्त्र आणि वैद्यकीय शाखेत हावर्ड विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठ पहिल्या तीन स्थानी आहेत. नॅचरल सायन्स शाखेत मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, स्टॅनफोर्ड विद्यापीठ, हावर्ड विद्यापीठाने आघाडी घेतली आहे. तर समाजशास्त्र आणि व्यवस्थापन शाखेत हावर्ड विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाने पहिले तीन क्रमांक पटकावले आहेत.

मुंबई ‘आयआयटी’च्या क्रमवारीत घसरण

मुंबई विद्यापीठासह अनेक महाविद्यालये, खासगी विद्यापीठांनी क्यूएसच्या जागतिक क्रमवारीकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. देशातील प्रथम क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून आयआयटी बॉम्बेने आपले स्थान यंदाही राखले असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आयआयटी बॉम्बेची क्रमवारी घसरली आहे. गेल्यावर्षी (२०२०) १५२ व्या स्थानावर असलेल्या आयआयटी बॉम्बेला यंदा १७२ वे स्थान मिळाले आहे. मुंबई विद्यापीठ, भारतीय रसायन तंत्रज्ञान संस्था यांसह अनेक नामांकित संस्थांनीही क्रमवारीबाबत उत्सुकता दाखवलेली नाही. देशातील विद्यापीठांची स्थिती, कार्यपद्धती, येथील शैक्षणिक गरजा आणि परदेशी विद्यापीठांची स्थिती यांमध्ये फरक आहे. आंतरराष्ट्रीय क्रमवारीचे निकष हे परदेशी संस्थांना केंद्रस्थानी ठेवून निश्चित करण्यात आले आहेत. अशी टीका सातत्याने करण्यात येते. यंदा एकूणातच भारतीय विद्यापीठांनी जागतिक क्रमवारीबाबत फारशी उत्सुकता दाखवल्याचे दिसत नाही.

* देशातील बारा संस्थांनी त्यांच्या विषयांत जगातील पहिल्या संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे.

* अभियांत्रिकी संस्थांच्या यादीत आयआयटी मुंबई ४९व्या, आयआयटी दिल्ली ५४व्या आणि आयआयटी मद्रास ९४व्या स्थानी आहे.

* नॅचरल सायन्स या विषयात बेंगळूरुची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स ९२व्या स्थानी आहे. त्यानंतर आयआयटी मुंबई ११४व्या, आयआयटी मद्रास १८७व्या, आयआयटी दिल्ली २१०व्या स्थानी आहे.

* आरोग्य विज्ञान आणि वैद्यकीय विभागात ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) २४८व्या स्थानी आहे. तर कला आणि मानव्यता शाखेत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) १५९व्या स्थानी आहे. त्यानंतर दिल्ली विद्यापीठ २५२ स्थानी आहे.

* जेएनयूतील मानवशास्त्र विभागाने शंभरात स्थान मिळवले.

* दिल्ली विद्यापीठाने समाजशास्त्र आणि व्यवस्थापन शाखांमध्ये जागतिक स्तरावर २०८वे स्थान मिळवले आहे.

* खासगी संस्थांपैकी ओ. पी. जिंदाल ग्लोबल विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाला पहिल्या शंभर अभ्यासक्रमात स्थान मिळाले आहे.