News Flash

चौकाचौकांत रिक्षांचे थांबे

अनधिकृत थांब्यांनी शहरातील अनेक चौक व रस्ते अडविले आहेत.

शहरात रिक्षांसाठी अधिकृत थांबे असतानाही रिक्षा चालकांकडून रस्त्यावर व चौकात वाहतुकीला अडथळा ठरेल अशाप्रकारे अनधिकृतपणे रिक्षा थांबे सुरू झाले आहेत. 

अधिकृत थांब्यांना चालकांची सोडचिठ्ठी; वाहतूक कोंडीत भर

शहरातील वाहतुकीला अडथळा होऊ नये आणि प्रवाशांनाही योग्य ठिकाणाहून रिक्षा उपलब्ध व्हावी, या दृष्टीने रिक्षा संघटनांना बरोबर घेऊन प्रादेशिक परिवहन प्राधिकरण आणि महापालिकेने शहरभर विविध ठिकाणी अधिकृत रिक्षा थांबे उभारले होते. मात्र, हे बहुतांश रिक्षा थांबे ओस पडले असून, सद्य:स्थितीत वाहतुकीला अडथळा ठरेल, अशा प्रकारे रस्त्यांवर व चौकाचौकात रिक्षा थांब्यांचे अतिक्रमण झाले आहे. ठरावीक रिक्षा चालकांचीच मक्तेदारी असलेल्या या अनधिकृत थांब्यांनी शहरातील अनेक चौक व रस्ते अडविले आहेत.

चौकात किंवा मोठी रहदारी असलेल्या रस्त्यावरच रिक्षा थांबे असल्याने वाहतुकीला होणारा अडथळा लक्षात घेता अधिकृत थांबे ठरविण्यात आले होते. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, महापालिका आदी यंत्रणांनी त्यासाठी शहरभर सर्वेक्षण केले होते. रिक्षा संघटनांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले होते. मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता, वाहतुकीला अडथळा ठरणार नसल्याची जागा त्याासाठी निवडण्यात आल्या. रिक्षा चालकाला प्रवासी मिळेल व प्रवाशालाही सहज रिक्षा उपलब्ध होईल, अशा पद्धतीने जागा निवडण्यात आल्या. त्या ठिकाणी अधिकृत रिक्षा थांब्याचा व रिक्षा उभ्या करण्याची संख्या असलेले फलकही लावण्यात आले.

अधिकृत रिक्षा थांब्यांमुळे कोणत्याही रिक्षा चालकाला कोणत्याही थांब्यावर रिक्षा उभी करण्याची मुभा असल्याने ही योजना रिक्षा चालकांसाठीच फायद्याची होती. मात्र, सुरुवातीचे काही दिवस हे थांबे सुरू राहिले. त्यानंतर हळूहळू पुन्हा अनधिकृत जागांवर रिक्षा थांबणे सुरू झाले. सद्य:स्थितीत प्रशासनाने ठरविलेले अधिकृत थांबे ओस पडलेले दिसतात. अतिक्रमण करून उभारलेल्या थांब्यांवर तसेच रस्त्यालगत कोठेही रिक्षा उभ्या केल्या जातात. पुण्यात वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, रोजच प्रत्येक रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक असते. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. त्यात भर घालण्याचे काम अनेक ठिकाणी अनधिकृत रिक्षा थांब्यांकडून केले जाते.

अनधिकृतपणे उभारलेले व ठरावीक रिक्षा चालकांचीच मक्तेदारी असलेल्या रिक्षा थांब्यांची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नव्याने लोकवस्ती होत असलेल्या भागातही अनधिकृत थांबे निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहतुकीला होणारा अडथळा रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाला जाणवतो. मात्र, वाहतूक पोलीस किंवा पालिकेकडून त्याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. रिक्षा थांब्यावरील बहुतांश रिक्षा चालक स्थानिक राजकारण्यांचे कार्यकर्ते असल्याने ही कारवाई होऊ दिली जात नसल्याचाही आरोप करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 3:56 am

Web Title: illegal auto rickshaw stand in pune
Next Stories
1 खासदार काकडे यांच्या सक्रियतेमुळे भाजपमध्ये अस्वस्थता
2 प्रलंबित खटल्यांची माहिती आता क्लिकवर
3 रिक्षाचालकांचे भाडे नाकारणे सुरुच
Just Now!
X