पसार झालेला बांधकाम व्यावसायिक गजाआड

नऱ्हे गावात बेकायदेशीर इमारत बांधून सदनिकांची अनेकांना विक्री करून पसार झालेल्या बांधकाम व्यावसायिकाला सिंहगड पोलिसांनी गजाआड केले. या बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकांची दहा कोटी रुपयांची फसवणूक केली होती. गेले दीड वर्ष पसार असलेल्या बांधकाम व्यावसायिकाला ठाणे जिल्ह्य़ातील मीरा रोड येथे पकडण्यात आले. विशेष म्हणजे धोकादायक असलेली ही इमारत प्रशासनाने पाडून टाकली होती.

मयूर रवींद्र आगाशे (वय ३५, रा. सदाशिव पेठ) असे अटक करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. नऱ्हे गावात आगाशे याने जागामालकाकडून बारा गुंठे जमीन खरेदी करून त्यावर आशीर्वाद अपार्टमेंट ही पाच मजली इमारत बांधली होती. या इमारतील १२५ सदनिकांची त्याने खरेदीखत करून ग्राहकांना विक्री केली. त्यापैकी काही सदनिकांची त्याने पुन्हा विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली होती. या इमारतीचे काम निष्कृष्ट दर्जाचे असल्याने तडे गेले होते. दरम्यान नऱ्हे परिसरातील सीताराम कॉप्म्लेक्स ही इमारत कोसळल्याची घटना घडली होती. त्यामुळे आशीर्वाद अपार्टमेंटमधील रहिवाशांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये सिंहगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली होती. पोलिसांनी या घटनेची माहिती महसूल विभागाला दिली तसेच आगाशे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

प्रशासनाकडून या इमारतीचे सुरक्षाविषयक लेखापरीक्षण (सिक्युरिटी ऑडीट) करण्यात आले होते. आशीर्वाद अपार्टमेंटमधील सी आणि डी या इमारती धोकादायक ठरवून पाडून टाकण्यात आल्या होत्या. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आगाशे हा कुटुंबासह पसार झाला होता. त्याने ही इमारत मुंबईतील एका व्यावसायिकाकडे दोन कोटी रुपयांना गहाण ठेवली होती. आगाशे याने तेथील सदनिकाधारकांसह आणखी काही जणांची दहा कोटी रुपयांची फसवणूक केली होती. सदनिकाधारकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रार दिली होती. सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांच्या सूचनेनुसार सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप यांनी आगाशे याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. आगाशे हा मीरा रोड येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे सापळा रचून पोलिसांनी त्याला पकडले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, किरण देशमुख, संतोष सावंत, पांडुरंग वांजळे, संग्राम शिनगारे यांनी ही कारवाई केली.