निगडीत हॉटेल तसेच खासगी प्रवासी बस व्यावसायिकांची कार्यालये राजरोस सुरू

पिंपरी : निगडी येथील कै. मधुकरराव पवळे उड्डाणपुलाखाली पत्र्याची शेड ठोकून त्यामध्ये हॉटेल तसेच खासगी प्रवासी बस व्यावसायिकांची कार्यालये राजरोस सुरू आहेत. स्थानिक नागरिकांनी याबाबत वेळोवेळी तक्रारी करुनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. अतिक्रमण करुन सुरू केलेल्या या बेकायदा व्यवसायांमुळे उड्डाणपुलाच्या सेवा रस्त्यावर वाहतूक खोळंबण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत.

निगडी येथील कै. मधुकरराव पवळे उड्डाण पुलाखाली पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्याच्या बाजूने उड्डाणपुलाखाली काही स्थानिक नागरिकांनी पत्र्याच्या शेड उभे करुन खासगी व्यवसाय सुरू केले आहेत. या शेडमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू असून काही शेडमध्ये खासगी बस व्यावसायिकांना तिकीट आरक्षणासाठी जागा भाडय़ाने देण्यात आल्या आहेत. हॉटेल व्यवसाय दिवसभर सुरू असतो.

निगडी चौकात शालेय विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांची मोठी वर्दळ असते. उड्डाणपुलावरुन तसेच उड्डाणपुलाच्या शेजारी असलेल्या सेवा रस्त्यावरुन वाहनांची मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत असते. उड्डाणपुलाच्या शेजारी पीएमपीचा जुना बस थांबा आहे. जुन्या बस थांब्याचे स्थलांतर झाल्यानंतर त्या परिसरात पथारीवाल्यांची अतिक्रमणे मोठय़ा संख्येत झाली आहेत. त्यामुळे सेवा रस्ता अरुंद झाला आहे.

मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्याच्या कडेला पीएमपीचा नवीन बीआरटी बस थांबा सुरू करण्यात आला आहे. या बस थांब्याच्या शेजारी अनधिकृतरीत्या रिक्षाचालक रिक्षा थांबवून प्रवासी घेतात. या परिसरात सायंकाळच्या वेळी खासगी प्रवासी बस व्यावसायिक सेवा रस्त्याच्या कडेला बस उभ्या करुन प्रवासी घेतात. वर्दळीचा चौक असलेला निगडी चौक अतिक्रमणांमुळे धोक्याचा झाला आहे. याबाबत महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. चौकाच्या सुशोभीकरणाला बाधा येत असल्याचे अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निर्दशनास आणले असता प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

निगडी येथील कै. मधुकरराव पवळे उड्डाणपुलाखालील पत्र्याच्या शेड अनधिकृत आहेत. या शेडवर कारवाई करण्याचा अधिकार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे आहे. संबंधित अतिक्रमणांवर त्या विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे.

-आशा दुर्गुडे, क्षेत्रीय अधिकारी, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी चिंचवड महापालिका