चिंचवड स्टेशन येथे सर्रास सुरू असलेल्या अवैध वाहतूक धंद्याला पोलीस व आरटीओची ‘कृपादृष्टी’ असल्याचे उघड गुपित आहे. तथापि, या भागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांनी त्याचे बिंग मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत फोडले. मुंबई-चिंचवड वाहतूक करणाऱ्या एका मोटारीला महिन्याला नऊ हजार रुपये हप्ता द्यावा लागतो आणि तब्बल २०० गाडय़ांकडून दरमहा वसुली होते, असा खळबळजनक खुलासा त्यांनी केला.
स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेच्या विषयपत्रिकेवर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांना दंड आकारण्यास व मिळणाऱ्या रकमेतील प्रत्येकी ५० टक्के रक्कम पालिका आणि वाहतूक पोलिसांना देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, सदस्यांनी तो विषय तहकूब ठेवला. या विषयावरील चर्चेत चिंचवड-मोहननगरचे नगरसेवक टेकवडे म्हणाले, सुमो, ट्रक्स आदी वाहने मुंबई-चिंचवड वाहतूक करतात. ही अवैध वाहतूक असल्याने त्यांना पोलीस व आरटीओला हप्ता द्यावा लागतो. अन्यथा पोलीस त्रास देतात, धंदा करू देत नाही. अनेकदा, अनेकांनी हा विषय मांडला. मात्र, त्यावर नियंत्रण आणण्यात यश आले नाही. एखाद्याने विरोध केला की तो दडपून टाकला जातो. पेपरमध्ये बातमी आली, की काही दिवस वाहतुकीचे ठिकाण पुढे-मागे केले जाते. नंतर हप्ता वाढवून पुन्हा वाहतूक सुरू होते. अशाप्रकारे शहरात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या ‘हप्तेगिरी’चे काय, असा मुद्दा मांडून चिंचवड स्टेशनला महिन्याकाठी जमा होणाऱ्या १८ लाखांतील निम्मी रक्कम ते पालिकेला देणार का, असा उपरोधिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
..‘त्या’ खेळाडूंना मंजुरी कशी?
खेळाडूंना वैयक्तिक नावाने अनुदान येत नसल्याचे अधिकारी सांगतात. मात्र, याच अधिकाऱ्यांनी अभिनव बिंद्रा, विजेंद्रकुमार व सुशीलकुमार यांना प्रत्येकी पाच लाख रुपये मंजूर केल्याची बाब नगरसेवक महेश लांडगे यांनी निदर्शनास आणून दिली. त्याच धर्तीवर विकी बनकर, अमोल आढाव, प्रवीण नेवाळे आदी नामवंत खेळाडूंना अनुदान देण्याचे प्रस्ताव सभेने मंजूर केले आहेत, ते शासनाकडे पाठवावेत, अशी मागणी त्यांनी केली.