बेकायदा बांधकामांवरून पिंपरीतील राजकारण पुन्हा तापले

पिंपरी-चिंचवड शहरातील बेकायदा बांधकामांच्या विषयावरून नव्याने राजकारण तापले असून सत्तारूढ भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. त्यांच्यातील गंभीर स्वरूपाच्या आरोप प्रत्यारोपांमुळे वातावरण गढूळ झाले आहे. या राजकारणात आयुक्तांची मात्र कोंडी झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात बेसुमार बांधकामे वाढली असून पालिकेची कारवाई संथपणे सुरू असल्याचे दिसून येते.

बेकायदा बांधकामे हा शहराच्या राजकारणात कायम कळीचा मुद्दा ठरला आहे. महापालिका, विधानसभा तथा लोकसभेच्या निवडणुका जवळ येताच या विषयावरून राजकारण सुरू होते, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. सध्या कोणत्याही निवडणुका नसताना या विषयावरून भाजप-राष्ट्रवादीत जुंपली आहे. वास्तविक दोन्हीकडील कार्यकर्ते एकाच गटातील आहेत. सद्य:स्थितीत त्यांच्यात प्रचंड बिनसले असल्याने ते एकमेकांवर तुटून पडले आहेत. माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या बंगल्यातील अतिरिक्त बांधकामास पालिकेने नोटीस बजावल्यापासून यासंदर्भातील वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर, जगताप रोजच नवनवे आरोप करत आहेत. त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे यांना भाजपकडून पुढे करण्यात आले आहे. दोन्हीकडून होत असलेल्या गंभीर आरोपामुळे वातावरण गढूळ बनले आहे. या विषयावरून भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप रडारवर आले असून पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची कोंडी झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे होत आहेत. शहरातील असा एकही भाग राहिला नाही, ज्या ठिकाणी नव्याने बांधकामे होत नाहीत. २०१५ नंतरच्या बांधकामांना संरक्षण मिळणार नाही, हे उघड असतानाही नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात बांधकामे होत आहेत. त्या विरोधात पालिकेकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचे दिसते. काही ठिकाणी तोंड पाहून पाडापाडी केली जाते अथवा भाजप नेत्यांच्या सांगण्यानुसार कारवाई केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. पालिकेकडून होणाऱ्या बेकायदा बांधकामांच्या विरोधातील कारवाईप्रसंगी नगरसेवक हस्तक्षेप करतात, असे निदर्शनास आल्याचे सांगत आयुक्तांनी, नगरसेवकांनी असा हस्तक्षेप टाळावा, असे आवाहन केले आहे. सरकारी कामात अडथळा आणल्यास कारवाई करण्याची तरतूद आहे, याकडे त्यांनी नगरसेवकांचे लक्ष वेधले आहे.

((  पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदा बांधकामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. पालिकेकडून कारवाई संथपणे होत असल्याच्या तक्रारी आहेत.  ))