उत्पन्नाच्या लक्ष्यासाठी आरक्षित प्रवासी वेठीला; जखमी प्रवाशामुळे पुणे रेल्वेचा घोळ उघडकीस

रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये सर्वसामान्य डब्यातील किंवा तिकीट नसलेल्या प्रवाशांना घुसविण्याचा प्रकार चक्क रेल्वेकडून करण्यात येत असल्याच उघड झाले आहे. केवळ उत्पन्नाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आरक्षित डब्यातील प्रवाशांना वेठीला धरण्यात येत आहेत. एका जखमी प्रवाशामुळे हा सर्व घोळ समोर आला आहे. तिकीट तपासणिसांनी आरक्षित डब्यात बसण्याची व्यवस्था केलेल्या या प्रवाशाला पुणे स्थानकावरच अपघात झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिकीट आणि दंडाच्या पावतीवर त्याला दौंडमध्ये आरक्षित डब्यात पकडण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे.

सर्वसामान्य डब्यातील प्रवासाचे तिकीट असलेला एखादा प्रवासी तिकीट तपासणीमध्ये आरक्षित डब्यामध्ये सापडल्यास त्याला दंड आकारून सर्वसामान्य डब्यामध्ये बसविणे आवश्यक आहे. मात्र, आरक्षित डब्यामध्ये सापडलेल्या प्रवाशांना दंड आणि तिकिटाच्या फरकाची रक्कम आकारून तिकीट तपासणीस आरक्षित डब्यातून प्रवास करण्याची मुभा देतात. इतकेच नव्हे, तर सामान्य डब्याचे तिकीट काढलेल्या किंवा कोणतेही तिकीट न काढलेल्या प्रवाशांना फलाटावरच आरक्षित डब्यातील प्रवासाचा दंड आणि तिकिटाची रक्कम आकारून आरक्षित डब्यात बसवितात. संबंधित प्रवाशाला तिकीट तपासणीच्या दरम्यान प्रवासात पकडण्यात आल्याचे दाखविण्यात येते. पुण्याहून जाणाऱ्या पटना, गोरखपूर, लखनौ, हावडा, दरभंगा आदी गाडय़ांबाबत हा प्रकार सातत्याने होत आहे. जखमी प्रवाशाच्या प्रकरणानंतर या सर्वच प्रकाराचा उलगडा झाला.

सूरज कनोजिया हा प्रवासी त्याच्या कुटुंबासह १९ एप्रिलला पुणे-पटना या गाडीने प्रवास करण्यासाठी पुणे स्थानकावर आला असताना त्याला फलाटावरच तिकिट तपासणिसांनी आरक्षित डब्यात बसण्याची व्यवस्था केली. त्यासाठी दंड आणि तिकिटाच्या रकमेची पावतीही दिली. गाडी फलाटाला येत असताना ती पकडण्याच्या प्रयत्नात सूरज खाली पडून थेट गाडीखाली आला. त्यात त्याचा हात पूर्णपणे निकामी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येऊन तेथे त्याचा हात काढावा लागला. या प्रकरणानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट दिली. मात्र, संबंधित प्रवाशाला कोणतीही आर्थिक मदत केली नाही. तिकीट तपासणिसानी त्याला दिलेल्या पावतीमध्ये दौंडचा उल्लेख आहे. म्हणजे त्याला दौंडला आरक्षित डब्यात पकडण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. याच पावतीवरून रेल्वेचा हा सर्व घोळ स्पष्ट झाला आहे. या प्रकरणात संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षां शहा यांनी केली आहे.

अमर्याद तिकीट विक्री

आरक्षित डब्यांमध्ये उपलब्ध आसानांप्रमाणे तिकिटे दिली जातात. मात्र, सर्वसामान्य डब्यामध्ये अमर्यादपणे तिकिटांची विक्री केली जाते. त्यामुळे काही वेळेला डब्यात पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. काही प्रवाशांना डब्यातही शिरता येत नाही. हीच संधी साधत अशा प्रवाशांना दंड आणि तिकिटाच्या फरकाची रक्कम आकारून आरक्षित डब्यात अनधिकृतपणे प्रवेश दिला जातो. त्यातून आरक्षित डब्यातील प्रवाशांचीही गैरसोय होते. त्यामुळे अमर्याद तिकीट विक्रीवर मर्यादा आणण्याची मागणी केली जात आहे.

आरक्षित डब्यांमध्ये चुकीच्या पद्धतीने अनधिकृत प्रवाशांना घुसविण्यात येत आहे. गाडीमध्ये तपासणी न करता फलाटावरच दंड आणि तिकिटाच्या रकमेच्या पावत्या फाडून प्रवासी आरक्षित डब्यात बसविले जातात. हा सर्व प्रकार बेकायदा आहे. पुणे स्थानकावर जखमी झालेल्या या प्रवाशाच्या प्रकरणातून याचा उलगडा झाला आहे. मुळात या प्रवाशाला रेल्वेने नुकसान भरपाई देणे आवश्यक असताना एक पैसाही दिलेला नाही. पावतीद्वारे आरक्षित डब्यातील प्रवासाचे तिकीट देण्याचा अधिकार तिकीट तपासणिसांना नाही.

हर्षां शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा