News Flash

उद्योगनगरीतील पिस्तूल विक्रीचा धंदा तेजीत

काही वर्षांपासून शहरात पिस्तूलविक्रीचा धंदा जोमात सुरू आहे.

उद्योगनगरीतील पिस्तूल विक्रीचा धंदा तेजीत

पिंपरी : शहरातील वाढत्या गुन्हेगारीचे महत्त्वाचे कारण असलेल्या बेकायदेशीर पिस्तूल विक्रीचे ‘कनेक्शन‘ उत्तर प्रदेश, बिहारनंतर आता मध्य प्रदेशशी जोडले जात आहे. पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सातत्याने कारवाई होत असतानाही उद्योगनगरीत हा उद्योग भलताच तेजीत आहे.

काही वर्षांपासून शहरात पिस्तूलविक्रीचा धंदा जोमात सुरू आहे. िपपरी पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतरही या ‘उद्योगा‘ला कोणतीही झळ बसलेली नाही. किंबहुना, त्याचे कार्यक्षेत्र आणखी विस्तारले आहे. आतापर्यंत ‘यूपी-बिहार‘ हे या उद्योगाच्या केंद्रस्थानी होते. आता मध्य प्रदेशातील चंबळ खोऱ्यातून सर्वाधिक उलाढाल होत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येते. खून, अपहरण, सुपाऱ्या, दमटाटी, लूटमार अशा विविध गुन्ह्य़ांमध्ये पिस्तुलांचा वापर झाल्याची नोंद आहे. खबरी तथा या वर्तुळातील माहीतगारांकडून पोलिसांना पिस्तूल विक्रीच्या रॅकेटची सविस्तर माहिती पुरवली जाते. मात्र, त्या माहितीचा स्वतच्या सोयीप्रमाणे पोलीस यंत्रणेकडून वापर करण्यात येतो. पिस्तूल प्रकरणात कधीतरी मोठी कारवाई होते. अलीकडेच िपपरी-चिंचवडला ४२ पिस्तूल आणि १५ आरोपी एकाच दिवशी पकडण्यात आले. अशा कारवाईप्रसंगी पोलिसांकडून स्वतची पाठ थोपटून घेण्यात येते. मात्र अनेकदा तोडपाणी होऊन प्रकरण दडपण्यात येते, त्यात संगनमताने लाखोंचे व्यवहार होतात, तेव्हा सर्वजण सोयीचे मौन धारण करतात, हे उघड गुपित आहे.

ग्राहकांच्या एकत्रित मागणीनुसार एकाच वेळी मध्य प्रदेशातून पिस्तूल आणले जातात. तेथे स्वस्तात मिळालेले पिस्तूल शहरात चढय़ा किमतीने विकले जातात. खरेदी-विक्रीच्या या साखळीत गुन्हेगारी वर्तुळापासून पोलीस वर्तुळातील अनेकजण सक्रिय असल्याचे दिसून येते. पैशांच्या व्यवहारात फिसकटले तरच पोलिसांपर्यंत प्रकरण जाते. अन्यथा, सर्वकाही सुरळीतपणे चालते.

साधारणपणे २५ ते ४० हजारापर्यंत पिस्तूल विकले जाते. पिंपरी-चिंचवडमध्ये बहुतांश पिस्तूल मध्य प्रदेशातून येत असल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे. दैनंदिन स्वरूपात पिस्तूल पकडण्याची कार्यवाही सुरूच आहे. मोठी कारवाई होण्यासाठी सर्व गोष्टी जुळून येणे आवश्यक असते. अशा प्रकरणातील सूत्रधार शोधण्याचे तसेच पिस्तूलचा वापर करून होणाऱ्या गुन्ह्य़ांना पायबंद घालण्यासंदर्भात आवश्यक कारवाई पोलिसांकडून सुरू आहे.

– रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 2:41 am

Web Title: illegal pistol sale in pimpri chinchwad city zws 70
Next Stories
1 मॉलला परवानगी मात्र व्यापाऱ्यांवर निर्बंध
2 राज्यावर जलसंकट
3 ऑनलाइन संस्कृत संभाषण वर्गाला प्रतिसाद
Just Now!
X