लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली चौकशी व त्यानंतर टाकलेल्या छाप्यांमध्ये निवृत्त सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सज्जाक राजेखान बारगीर यांच्याकडे कोटय़वधीची बेकायदेशीर मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. पुणे, सातारा, सांगली व सोलापूर येथील छाप्यांमध्ये बारगीर यांची तीन कोटी ९३ लाख रुपयांची संपत्ती मिळाली आहे. याप्रकरणी बारगीर व त्यांच्या पत्नीवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रिझवाना सज्जाद बारगीर (वय ४३, रा. रहेजा गार्डनजवळ, वानवडी) असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. बारगीर यांनी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून ठाणे, सोलापूर, नाशिक, मुंबई, सातारा, नागपूर येथे काम केले होते. सप्टेंबर २००९ मध्ये नागपूर येथे त्यांच्या मोटारीतून १८ लाख रुपये मोटारीतून चोरीला गेले होते. ही रक्कम बेकायदेशीर मार्गाने जमविल्याची माहिती मिळाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघड चौकशीला सुरूवात केली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक राजेंद्र गलांडे यांनी बारगीर यांच्या मालमत्तेची उघड चौकशी केली. बारगीर हे १९७४ ते २०११ या काळात नोकरीवर होते. फेब्रुवारी २०११ मध्ये ते सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. या काळात बारगीर यांनी पत्नीशी संगनमत करून साठ टक्के बेहिशोबी मालमत्ता जमविल्याचे उघड झाले. त्यानुसार वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड यांनी दिली.
बारगीर यांची सुरुवातीला ९५ लाख ५२ हजार रुपये बेहिशोबी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर टाकलेल्या छाप्यांमध्ये सांगली येथे पत्नीच्या नावावर ९० लाख ६२ हजार रुपयांचा बंगला,  सातारा येथे ६० लाखांचा बंगला आणि १४ लाखांची सदनिका, सोलापूर येथे पत्नीच्या नावावर २३ लाख ८४ हजार रुपयांची २५ एकर शेती, ३५ लाख ३५ हजारांचा बंगला आणि पावणे तीन लाखांचे साहित्य मिळाले आहे. तर, पुण्यात वानवडी येथील सदनिकेत अर्धा किलो सोने आणि अर्धा किलो चांदी, एफडी, चार मोटार सायकल आणि एक कार असा एक कोटी ६३ लाख २७ हजाराचा ऐवज मिळून आला आहे. ही सर्व मालमत्ता एकूण तीन कोटी ९३ लाख रुपयांची आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक दातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे, राजेंद्र गलांडे, बापू काळे, अशोक भारती, पोलीस निरीक्षक विनोद सातव, दत्तात्रय सुरवसे, वैशाली पाटील यांनी केली.