मार्केटयार्डात भाज्या, फळांची बेकायदा विक्री; नवीन नियमावली कागदावरच

पुणे : मार्केटयार्डातील वाहतूक कोंडी, अस्वच्छता तसेच बाजार आवारातील गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून नवीन नियमावलीची अंमबलवजावणी करण्यात आलेली असतानाही बाजारआवारात बनावट आडत्यांचा सुळसुळाट झाला आहे. बाजार आवारातील तरकारी विभाग आणि फळबाजारात फळभाज्यांची तसेच फळांची विक्री बेकायदा  सुरू करण्यात आली असून अशा बनावट आडत्यांमुळे शेतकरी तसेच बाजार समितीचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

बनावट आडत्यांकडे बाजार समितीचे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने बनावट आडत्यांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप बाजार आवारातील घटकांनी केला. बाजार आवाराला शिस्त लावण्यासाठी नवीन नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येत असली तरी नवीन नियमावली तूर्तास कागदावरच असल्याचे चित्र आहे.

बाजार आवारातील गाळ्यांवर शेतीमाल विक्रीला मदतनीस म्हणून दोन अन्य व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याची परवानी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात एका गाळ्यावर दोन अन्य व्यापाऱ्यांच्या नावाखाली ५ ते १० बनावट व्यापारी शेतीमाल विक्री व्यवसाय करत असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारांमुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान होत आहे. मूळ गाळेधारकाकडून कमी दरात शेतीमाल खरेदी करून बनावट आडता किंवा व्यापारी गाळ्यासमोर शेतीमालाची विक्री करत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

अशा प्रकारांमुळे शेतक ऱ्यांचे नुकसान होत असल्याची माहिती बाजार आवारातील घटकांनी दिली. बाजार समितीच्या प्रशासकपदी बी. जे. देशमुख यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांनी बाजार आवाराला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले. नवीन नियमावलीमुळे बाजारआवाराला शिस्त लागली असली तरी गेल्या काही दिवसांपासून बेकायदा व्यापार करणाऱ्यांचे पेव पुन्हा फुटले आहे.

मूळ गाळेधारकाला लाखो रुपयांचे भाडे

मार्केटयार्डातील मूळ गाळेधारक म्हणजेच आडत्याला डमी व्यापाऱ्यांकडून दरवर्षांला भाडे दिले जाते. दीड लाखांपासून तीन लाख रुपयांपर्यंत मूळ गाळेधारकाला भाडे मिळते. फळबाजारात पादचारी मार्गावर बेकायदा फळविक्री करण्यात येत आहे. गाळ्यांसमोर पंधरा फुटांपर्यंत शेतीमाल विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. काही जणांकडून या नियमावलीचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे खरेदीदार तसेच हमालांना या भागातून चालणे शक्य होत नाही. तरकारी विभागात लिंबू विक्रेत्यांकडून मिळेल त्या जागेवर व्यापार करण्यात येत आहे. आडते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या गाळ्यांवर डमी व्यापाऱ्यांची संख्या जास्त असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.