सोसायटय़ांचा आरोप

पुणे : पिसोळीतील वीर सावरकर रस्त्यावर निवासी भागात बेकायदा गोदाम उभारण्यात आले आहे. हा रस्ता सोसायटय़ांकडे जाणारा असून या रस्त्यावर दिवसभर जड वाहतूक होत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्यावर उभारण्यात आलेल्या बेकायदा गोदामांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे केली आहे.

पिसोळी येथील वीर सावरकर रस्त्यावरील साई श्रद्धा, अ‍ॅक्मी सिलेन, कु मार पाल्मक्रिस्ट, किं गस्टन एल्सिया आणि साई श्रद्धा बंगलो या पाच सोसायटय़ांनी एकत्र येत वीर सावरकर रोड असोसिएशन ऑफ हाउसिंग सोसायटी ही संघटना स्थापन केली. या सोसायटय़ांमध्ये ५०० सदनिका आणि ८० बंगले असून त्यामधून दोन हजार नागरिक वास्तव्याला आहेत. गेल्या वर्षी पिसोळी ग्रामपंचायतीकडून या रस्त्याचे रुंदीकरण करून तो सिमेंट काँक्रिटचा करण्यात आला आहे. हा संपूर्ण भाग निवास असतानाही या ठिकाणी बेकायदा गोदामे उभारण्यात येत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी अवजड वाहतूक होत असते. परिणामी सोसायटय़ांमधील ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना जीव मुठीत धरून सोसायटीतून ये-जा करावी लागते. तसेच हा रस्ता साध्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठीचा असल्याने जड वाहनांमुळे गेल्या वर्षीच के लेल्या या रस्त्याचे नुकसान होत आहे, याकडे संघटनेने लक्ष वेधले. काही दिवसांपूर्वी ब्रेक फे ल झाल्याने एक जड वाहन या ठिकाणच्या एका भिंतीला धडकले. सुदैवाने त्या वेळी स्थानिकांपैकी कोणी वाहनधारक सोसायटीमध्ये ये-जा करत नव्हते, अन्यथा मोठा अपघात झाला असता. याबाबत पीएमआरडीएकडे तक्रार करण्यात आली आहे.

पीएमआरडीए कार्यक्षेत्रात निवासी भागात गोदाम उभारता येत नाही, असा नियम नाही. संबंधित गोदाम अनधिकृत आहे किं वा कसे?, याबाबत माहिती घेण्यात येईल. गोदाम अनधिकृत असल्यास आणि स्थानिक नागरिकांची तक्रार असल्यास गोदामावर निश्चित कारवाई करण्यात येईल.

– विवेक खरवडकर, मुख्य अभियंता, पीएमआरडीए