दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घडलेल्या प्रकाराचा निषेध करतानाच कन्हैया कुमार याला पुण्यातील विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंनी पाठिंबा दिला आहे. त्याला वकिलांकडून झालेल्या मारहाणीचा देखील निषेध करण्यात आला आहे.
कन्हैया कुमार याला पतियाळा उच्च न्यायालयात वकिलांकडून मारहाण झाली होती. त्याचा निषेध विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. आयएलएस विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी याबाबत पत्र दिले आहे. ‘आरोपीवर हल्ला करणे म्हणजे आरोपीला परस्पर दोषी ठरवून शिक्षा करण्याचा प्रकार आहे. वकिलांचे हे कृत्य निंदनीय आहे,’ असे या विद्यार्थ्यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. कन्हैया कुमार याच्यावरील सर्व आरोप मागे घेऊन त्याची त्वरित सुटका करण्यात यावी. पतियाळा उच्च न्यायालयाच्या बार काऊन्सिलने हल्ला करणाऱ्या वकिलांवर कारवाई करावी. हल्ला करणाऱ्या वकिलांची पोलिसांकडून चौकशी व्हावी आणि दोषी आढळलेल्या वकिलांवर कारवाई करण्यात यावी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीतील महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे राजद्रोहाच्या गुन्ह्य़ामध्ये भाषणे, वक्तव्ये यांचा समावेश करू नये. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील पोलिस बंदोबस्त मागे घेण्यात यावा आणि कन्हैया कुमार आणि उमर खालीद यांना संरक्षण देण्यात यावे. शैक्षणिक संस्थांमधील हस्तक्षेप बंद करावा, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.