इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी यासिन भटकळ याला पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. भटकळला कडक पोलीस बंदोबस्तात पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले. जर्मन बेकरी स्फोटात चौकशीसाठी भटकळला १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी न्यायालयाकडे केली. विशेष सत्र न्यायाधीश एस. बी. दरणे यांनी ती मान्य केली.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटांवेळी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱयाच्या चित्रीकरणात यासिन भटकळ दिसतो आहे त्याचबरोबर या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींना अटक करायची आहे. त्यामुळे भटकळला पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली. ती न्यायालयाने मान्य केली. देशात विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात यासिन भटकळ आरोपी आहे. गेल्यावर्षी त्याला आणि त्याचा साथीदार असादुल्ला अख्तर यांना भारत-नेपाळच्या सीमेवरून अटक करण्यात आली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 14, 2014 12:31 pm