28 September 2020

News Flash

डॉक्टरांच्या‘कट प्रॅक्टिस’वर शस्त्रक्रिया!

औषध कंपन्या, औषधविक्रेते आणि रोगनिदान प्रयोगशाळांकडून मिळणाऱ्या ‘कमिशन’च्या मोहात अडकलेल्या डॉक्टरांना आता चाप बसण्याची शक्यता आहे.

| July 5, 2014 03:30 am

औषध कंपन्या, औषधविक्रेते आणि रोगनिदान प्रयोगशाळांकडून मिळणाऱ्या ‘कमिशन’च्या मोहात अडकलेल्या डॉक्टरांना आता चाप बसण्याची शक्यता आहे. या डॉक्टरांची ‘कमिशनखोरी’ बंद करण्यासाठी आता ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) या डॉक्टरांच्या संघटनेनेच पुढाकार घेतला असून, कोणत्याही प्रकारची ‘कट प्रॅक्टिस’ आढळल्यास रुग्ण आयएमएला संबंधित डॉक्टरांचे नाव कळवू शकणार आहेत.
महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने नुकतीच कट प्रॅक्टिसबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली असून त्याला पाठिंबा देत आयएमएने डॉक्टरांची कट प्रॅक्टिस बंद करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आयएमएचे राज्याचे अध्यक्ष डॉ. दिलीप सारडा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत आयएमएची भूमिका मांडली. डॉ. सारडा म्हणाले, ‘वैद्यकीय व्यवसायात सुमारे १० ते १५ टक्के डॉक्टर कट प्रॅक्टिस करतात. कट प्रॅक्टिसमुळे रुग्ण आणि डॉक्टरांच्या नात्यावर तर परिणाम होतोच, पण वैद्यकीय व्यवसायाची प्रतिमाही डागाळते आहे. आयएमएच्या सर्व शाखांतर्फे कट प्रॅक्टिसच्या विरोधात मोहीम सुरू करण्यात आली असून, यात रुग्णांनी कट प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचे नाव आयएमएला कळवल्यास त्या प्रकरणाची शहानिशा करून तथ्य आढळल्यास संबंधित डॉक्टरला आयएमएमधून काढून टाकले जाईल. तसेच त्याचे नाव महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलला (एमएमसी) कळवले जाईल. त्यानंतर एमएमसी डॉक्टरवर कारवाई करेल.’
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून विदर्भ, नांदेड, लातूर आणि वाशिममधील आयएमएच्या शाखांमध्ये ही मोहीम राबवली जात असून त्यामुळे रुग्णांना विशिष्ट ठिकाणाहूनच चाचण्या करून आणण्यास सांगण्याचे प्रमाण आणि विनाकारण केल्या जाणाऱ्या वैद्यकीय चाचण्या १० ते १५ टक्क्य़ांनी कमी झाल्याचे दिसून येत आहे.
कट प्रॅक्टिस म्हणजे..
*विशिष्ट औषधे लिहून देण्यासाठी, विशिष्ट औषधविक्रेत्याकडूनच औषधे खरेदी करण्यास सांगण्यासाठी कमिशन घेणे
*रुग्णाला विशिष्ट प्रयोगशाळेतूनच चाचण्या करून घेण्यास सांगण्यासाठी कमिशन घेणे
*औषध कंपन्यांकडून मिळणाऱ्या परदेशी सहलींच्या संधी घेणे. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित कोणतेही कमिशन किंवा भेटवस्तू स्वीकारणे

डॉक्टरांना शिक्षा करणे हा आमचा हेतू नाही. प्रथम डॉक्टरांमध्ये वैद्यकीय व्यवसायाच्या मूल्यांविषयी जनजागृती करणे, तरीही ते कट प्रॅक्टिस करत असल्यास त्यांचे समुपदेशन करणे आणि शेवटचा उपाय म्हणून शिक्षा करणे अशी ही मोहीम आहे. कायद्याच्या कलम २२ अनुसार डॉक्टरांचे वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र निलंबित वा रद्द करण्याचे अधिकार काऊन्सिलला आहेत.
डॉ. किशोर टावरी, महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलचे अध्यक्ष.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2014 3:30 am

Web Title: ima cut practice doctor ban
टॅग Ban,Doctor
Next Stories
1 ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’वर विश्वास नाही! – डॉ. कलाम
2 पुणेकर ऑनलाइन ग्राहकांची ‘फास्ट फूड’ला पसंती!
3 आधी पैशांचं बोला..
Just Now!
X