News Flash

अपघातग्रस्तांना तातडीने मदत

दीड महिन्यांच्या उपचारांनंतर नीलय घरी गेला असून तो नियमित जीवन जगत आहे.

अपघातग्रस्तांना तातडीने मदत
‘लाईफ सेव्हिंग फाउंडेशन’ चे युवक

‘लाईफ सेव्हिंग फाउंडेशन’च्या युवकांचा उपक्रम

पुणे :  बाणेर रस्त्यावर फेब्रुवारीमध्ये झालेला अपघात.. बघ्यांच्या गर्दीतून गंभीर जखमी झालेल्या तरुणाला मदत करण्यासाठी पुढे सरसावलेला युवक.. तातडीने मदत मिळाल्यामुळे तरुणाला मिळालेले जीवदान.. अशी वेळ कोणावरही येऊ नये यासाठी या युवकाने ‘लाईफ सेव्हिंग फाउंडेशन’ची केलेली स्थापना.. एका युवकाला मिळालेली ४० तरुणाईची साथ.. अपघातग्रस्तांना जीव वाचविण्यासाठी तातडीची मदत मिळावी या विषयावर चौकातील सिग्नलवर नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे.

रस्ते सुरक्षा ही सामाजिक समस्या निर्माण झाली असून वाहतूक कोंडी आणि पुढे जाण्यासाठी वाहन भरधाव दामटण्याच्या कृतीतून वाढत असलेल्या अपघातांची संख्या हा चिंतेचा विषय झाला आहे. दुर्दैवाने अपघात झाला, तर अपघातामध्ये जखमी झालेल्यांना तातडीने वैद्यकीय मदत करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. फेब्रुवारीमध्ये झालेल्या अशाच एका अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाला देवेंद्र पाठक या युवकाने तातडीने मदत केली. अशी वेळ दुसऱ्या कोणावरही येऊ नये या भूमिकेतून त्याने ‘लाईफ सेव्हिंग फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. या संस्थेकडे तब्बल ४० युवा कार्यकर्त्यांची फौज असून दर रविवारी प्रत्येक चौकामध्ये नागरिकांचे प्रबोधन करण्यावर भर देण्यात येत आहे. नामदार गोखले रस्त्यावरील सिग्नल येथे रविवारी (२४ जून) सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळात नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. आमच्या ४० जणांच्या चमूमध्ये चार महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यांत सुदैवाने अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही. मात्र, दुर्दैवाने अपघात घडलाच तर, आमचे कार्यकर्ते सर्वप्रथम मदतीला धावून जातील, असे पाठक यांनी सांगितले.

एक अपघात ‘लाईफ सेव्हिंग फाउंडेशन’च्या स्थापनेला कारणीभूत ठरला, असे सांगून पाठक म्हणाले, बाणेर रस्त्यावर अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या नीलय पाटील याच्या मोटारसायकलचा फेब्रुवारीमध्ये अपघात झाला. त्याचे वाहन घसरले आणि डोक्यावर हेल्मेट असलेला नीलय समोरच्या विद्युत खांबावर जाऊन धडकला. तेथे बघ्यांची गर्दी झाली खरी, पण कोणीही त्याला मदत करण्यासाठी पुढे येईना. जवळच्या हॉटेलमध्ये नाश्ता करून बाहेर पडत असताना मी हे दृश्य पाहिले आणि तातडीने नीलय याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. चार रिक्षावाले थांबायला तयार होत नव्हते. अखेर पाचव्या रिक्षाचालकाला विनंती करून नीलय याला जवळच्या रुग्णालयात नेले. त्याच्या पालकांचा ठावठिकाणा सापडेपर्यंत जबाबदारी घेऊन डॉक्टरांना तातडीने नीलय याच्यावर उपचार करण्याची विनंती केली. त्याच्या खिशातील पाकिटामध्ये असलेल्या आधार कार्डवरून त्याचा पत्ता सापडला. तीच रिक्षा घेऊन त्याच्या आई-वडिलांना रुग्णालयात घेऊन आलो. डोक्यावर हेल्मेट असताना जबरी मार बसल्यामुळे नीलय याचा मेंदू १० मिलिमीटर हलला होता. शस्त्रक्रिया करून त्याला जीवनदान देण्यात डॉक्टरांना यश आले. दीड महिन्यांच्या उपचारांनंतर नीलय घरी गेला असून तो नियमित जीवन जगत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते २२ मार्च रोजी फाउंडेशनची स्थापना झाली. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांना ही कल्पना दिली आणि त्यांनी पाठिंबा दिला. विविध महाविद्यालयीन प्राचार्यानी प्रबोधन मोहिमेत सहभाग घेत आमचा उत्साह द्विगुणित केला.

असे होते ‘लाईफ सेव्हिंग फाउंडेशन’चे काम

*  हाती फलक घेऊन कार्यकर्त्यांकडून प्रबोधन

* वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

* दुचाकीवर हेल्मेट आणि चारचाकीमध्ये सेफ्टी बेल्टचा वापर करा.

* चौकामध्ये रस्ते ओलांडताना पादचाऱ्यांना प्राधान्य द्या.

* वाहन चालविताना मोबाइल फोन आणि अमली पदार्थाचा वापर टाळा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2018 2:40 am

Web Title: immediate help for the casualties from life savings foundation
Next Stories
1 माउलींचा पालखी रथ सर्जा-राजा वाहणार,
2 पुण्यात आठ हजार किलो कॅरीबॅग, ग्लास आणि थर्माकोल जप्त, तीन लाख ६९ हजाराचा दंड वसूल
3 धक्कादायक! पुण्यात आळंदीमध्ये ११ महिन्याच्या मुलाने गिळला रिमोटचा सेल
Just Now!
X