27 May 2020

News Flash

रोह्य़ातील ज्येष्ठ महिलेला पुण्यातून तातडीने औषधे

पोलिसांमधील माणुसकीचे अनोखे दर्शन

(संग्रहित छायाचित्र)

पोलिसांमधील माणुसकीचे अनोखे दर्शन

पुणे : पोलिसांची समाजात एक विशिष्ट प्रतिमा असते. करोनामुळे देशभरात टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर पोलीस कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत करत असून त्याबरोबरच पोलिसांकडून अनेकांना मदत केली जात आहे. कोकणातील रोहा येथे वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ महिलेला तातडीने औषधे पाठवायची होती. टाळेबंदीमुळे औषधे कशी पोहचणार या विवंचनेत असलेल्या पुण्यातील त्यांच्या मुलाने डेक्कन पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पोलिसांकडे व्यथा मांडली. डेक्कन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे रोह्य़ातील ज्येष्ठ महिलेपर्यंत औषधे पोहोचली.

डेक्कन जिमखाना भागातील भांडारकर रस्त्यावर वास्तव्यास असलेले सनदी लेखापाल अनिल धारप यांना पोलिसांमधील माणुसकीची प्रचिती नुकतीच आली. कृतज्ञेची भावना म्हणून त्यांनी पोलिसांना एक पत्र दिले असून या पत्रात त्यांनी पोलिसांचे मनोमन आभार मानले आहेत. याबाबत धारप म्हणाले, माझी ८० वर्षांची आई रोह्य़ात वास्तव्यास आहे. गेल्या काही वर्षांपासून ती आजारी आहे. तिला नियमित औषधे घेण्यास डॉक्टरांनी सांगितले. गेल्या महिनाभरापासून रोह्य़ात तिला देण्यात येणाऱ्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ही औषधे पुण्याहून पाठविण्याच्या विचारात मी होतो. गुढी पाडव्याला मी रोह्य़ात औषधे घेऊन जाण्याचे निश्चित केले होते. मात्र, टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर औषधे रोह्य़ात पाठविण्यास अडचण निर्माण झाली.

त्यानंतर मी ३१ मार्च रोजी डेक्कन पोलीस ठाण्यात गेलो आणि माझी व्यथा मांडली. रोह्य़ात औषधे पोहोचविण्यासाठी तुम्ही मदत कराल का? अशी विनंती डेक्कन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्याकडे केली. लगड यांनी मला धीर दिला. औषधे पोहोचविण्यास मी मदत करेन, असे सांगून त्यांनी माझा मोबाइल क्रमांक घेतला.

त्यानंतर शुक्रवारी (३ एप्रिल) सकाळी साडेअकराच्या सुमारास लगड यांनी मला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यांनी माझी निरगुडकर नावाच्या एका व्यक्तीची ओळख करून दिली. तुमची औषधे निरगुडकर पोहोचवतील असे त्यांनी सांगितले.

निरगुडकर यांना तातडीच्या कामासाठी महाडला जायचे होते. त्यासाठी त्यांना डेक्कन पोलिस ठाण्याकडून परवानगी हवी होती. लगड यांनी निरगुडकर यांना परवानगी दिली.

मात्र, धारप यांच्या आई रोह्य़ात असून त्यांना औषधे द्यावी लागतील, अशी अट लगड यांनी घालून दिली. निरगुडकर यांनी ही अट मान्य केली आणि शुक्रवारी सायंकाळी रोह्य़ात औषधे पोहोचली, असे धारप यांनी सांगितले.

रोह्य़ातील आईपर्यंत औषधे पोहोचविण्याच्या विचारात मी असताना डेक्कन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांची भेट घेतली. त्यांच्याकडे विनंती केली. आईकडे थोडय़ाच दिवसांची औषधे होती. लगड यांनी माझा मोबाइल क्रमांक घेतला पण कामाच्या व्यापात ते विसरून जातील, असे मला वाटले होते. लगड यांनी माझ्याशी पुन्हा संपर्क साधला आणि रोह्य़ात औषधे पोहोचविण्याची व्यवस्था केली. पोलिसांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

– अनिल धारप, सनदी लेखापाल, डेक्कन जिमखाना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 1:12 am

Web Title: immediate medicine for senior woman during lockdown by pune police zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 संसर्ग टाळण्यासाठी ‘फेस शिल्ड
2 कळवा, मुंब्रा, दिवा आणि पुण्यातील काही भागांना पूर्ण टाळे
3 पंधरा मिनिटांत निर्जंतुकीकरण करणारे ‘युव्ही सॅन’ विकसित; पुण्यातल्या लॅबची निर्मिती
Just Now!
X