सकाळी अर्ज, दुपारी परवानगी, रात्री वृक्षतोड; सर्वसामान्यांच्या अर्जाबाबत एवढी तत्परता कधी?

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील २० ते २५ झाडे कापण्यासंदर्भातील अर्ज सोमवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी महापालिकेला मिळाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी तात्काळ वृक्षतोडीला परवानगी देण्यात आली आणि रात्री वृक्षतोड  झाल्याचेही स्पष्ट  झाले आहे.

महायुतीच्या पुण्यातील आठ उमेदवारांसह जिल्ह्य़ातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले असून स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी (१७ ऑक्टोबर) सायंकाळी साडेचार वाजता ही सभा होणार आहे. पावसाची शक्यता गृहीत धरून मैदानावर छत असलेला मंडप उभा करण्यासाठी मैदानाच्या कडेने असलेली झाडे सोमवारी रात्री तोडण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. सभेसाठी करण्यात आलेली ही वृक्षतोड वादग्रस्त ठरली आहे.

वृक्षांची छाटणी करण्यासाठी महापालिकेकडे रीतसर परवानगी अर्ज दाखल करण्यात आला होता. महापालिकेने परवानगी दिल्यानंतरच झाडे छाटण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनच झाडांची छाटणी करण्यात आली असून त्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन यांनी केला होता.

नियमानुसार वृक्ष छाटण्यास मान्यता देण्यात आली असली तरी एका दिवसामध्येच ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिक्षण प्रसारक मंडळाकडून सोमवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी वृक्ष छाटणीसंदर्भातील अर्ज संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे देण्यात आला. या अर्जाला सोमवारी दुपारीच लगोलग मान्यता देण्यात आली आणि सोमवारी रात्री झाडे कापण्याचे काम करण्यात आले. एखाद्या संस्थेतील किंवा संस्थेच्या आवारातील वा खासगी इमारतीच्या, सोसायटीच्या आवारामधील धोकादायक झाडे तोडण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर त्यावर तात्काळ कार्यवाही होत नाही. नागरिकांना संबंधितांना क्षेत्रीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात, ही वस्तुस्थिती आहे.

अर्ज आल्यानंतर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडून धोकादायक झाडांची पाहणी केली जाते. आवश्यकता असल्यास फांद्या छाटण्याची मान्यता दिली जाते, ही महापालिकेची प्रक्रिया आहे. त्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील झाडांसंदर्भात एका दिवसात महापालिकेने केलेली ‘तत्पर कार्यवाही’ हा चर्चेचा विषय ठरला आहे.

सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील झाडे छाटण्यासंदर्भातील परवानगी अर्ज सोमवारी महापालिकेकडे आला होता. धोकादायक झाडे असल्यामुळे पाहणी करून त्याला तातडीने मान्यता देण्यात आली.

– आशीष महाडदळकर, क्षेत्रीय अधिकारी, कसबा-विश्रामबाग