वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सव यंदा साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, बाप्पाचे विसर्जन नदीपात्र किंवा त्या परिसरात असलेल्या विसर्जन हौदामध्ये करण्यासही यंदा प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून फिरते विसर्जन हौद तयार करण्यात आले आहेत. या हौदात किंवा घरीच बाप्पाचे विसर्जन करावे, असे आवाहनही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात फिरत्या हैदाचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि अधिकारी उपस्थित होते.

महापौर मोहोळ म्हणाले, “पुणे शहराने प्रत्येक संकटाच्या काळात जगाला संदेश देण्याचे काम केलं आहे. आता आपल्या सर्वांवर करोनासारखं संकट आल्यावर देखील आपण प्रत्येक उत्सव शांततेत साजरे केले आहेत. याच पद्धतीने गणेशोत्सवही साजरा करत आहोत. यातून पुन्हा एकदा आपण जगाला संदेश दिला आहे.

आता यापुढील काळात दीड, सात आणि दहा दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन नदी पात्रात करता येणार नाही. तसेच त्या परिसरात असलेल्या हौदात देखील विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून शहरातील अनेक भागात एकूण ३० फिरते हौद नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले आहेत. तसेच नागरिकांना घरीच विसर्जन करण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट पावडर देण्याची व्यवस्थाही करण्यात आली असून त्याचा वापर करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही महापौरांनी यावेळी केले.