गुलालाचा वापर टाळून फुलांची व भंडाऱ्याची उधळण, स्पीकरच्या भिंती उभारण्याऐवजी पारंपरिक ढोलताशांना पसंती, फुलांनी सजवलेल्या रथांना प्राधान्य देणारी मंडळे, काटेकोर नियम पाळण्याचा पोलिसांचा आग्रह, विधानसभा इच्छुकांचे राजकीय ‘फलकयुद्ध’, वरुणराजाची हजेरी अशा वातावरणात पिंपरीत साडेबारा तासांची तर चिंचवडला बारा तासांची विसर्जन मिरवणूक पार पडली. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’, अशा जयघोषात पिंपरी-चिंचवडकरांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
पिंपरीत दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ‘जीकेएन मेटल्स’चा पहिला तर रात्री बारा पाचला महेश मंडळाचा शेवटचा गणपती विसर्जित झाला. त्याचप्रमाणे, चिंचवडला दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी गरिमा मंडळाचा पहिला तर रात्री साडेबाराला आनंदनगर मित्रमंडळाचा शेवटचा गणपती विसर्जित झाला. गुलालाचा वापर कमी करत मंडळांनी भंडारा वापरला. फुलांनी सजवलेले रथ मिरवणुकांमध्ये आणून स्पीकर टाळले व ढोलताशांना प्राधान्य दिले. पिंपरीतील कराची चौकात तसेच चिंचवडच्या चापेकर चौकात महापालिकेने स्वागत कक्ष उभारले. आयुक्त राजीव जाधव, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सहआयुक्त दिलीप गावडे आदींनी मंडळांचे स्वागत केले. भाऊसाहेब भोईर, अनंत कोऱ्हाळे, अपर्णा डोके आदी राजकीय नेत्यांची स्वागत कक्षात गर्दी होती. दोन्हीकडील विसर्जन मार्गावर विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांनी जोरदार फलकबाजी करून मंडळांचे तसेच उपस्थितांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दुपारी घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. सायंकाळनंतर बहुतांश प्रमुख मंडळे मार्गस्थ झाली. पिंपरीतील शिवराजे प्रतिष्ठानने छत्रपती शिवाजीमहाराजांच्या रूपातील गणपतीचा आकर्षक देखावा केला. भाजीमंडईवाल्या लाल बहादूर शास्त्री मंडळाचे वारकरी पथक होते. गुलालाऐवजी फुलांची उधळण करण्याची परंपरा मंडळाने यंदाही कायम राखली. दिवसभरात दोन गणपतीत मोठे अंतर असणाऱ्या चिंचवडला सायंकाळी मात्र रांगा लागल्या. गांधी पेठ मंडळाच्या मिरवणुकीत फुलांची सजावट असलेला रथ व ज्ञान प्रबोधिनीचे पथक होते. राष्ट्रतेज मंडळाने छत्रपती संभाजीमहाराजांचा जिवंत देखावा सादर केला. मतदानाचे महत्त्व सांगणारा ज्ञानदेव मंडळाचा हंसरथ, काळभैरव मंडळाचा फुलपाखरू रथ, महाराणा प्रताप मंडळाचा मयूररथ, आदर्श मंडळाचा फुलांचा रथ, भोईर कॉलनीचा कीर्तिसिंह रथ, गावडे कॉलनीचा पांडुरंग रथ, जय गुरुदत्तचा सूर्यरथ आदींचे रथ लक्षवेधी होते. ‘जय मल्हार’ मालिकेतील खंडोबाची प्रतिकृती अनेकांनी साकारल्याचे दिसून आले. फटाके वाजवण्यावर बंदी असतानाही अनेक मंडळांनी आतषबाजी केली. पिंपरी घाटावर ‘स्वच्छ’ संस्थेकडून निर्माल्याचे वर्गीकरण करण्यात आले. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी, हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांनी जनजागृतीचे काम केले. रिव्हर रोड फ्रेंड सर्कल, ब्रह्माकुमारी व सेवाकरी समूहाने चहा-नाश्त्याची व्यवस्था केली. चिंचवडला संस्कार प्रतिष्ठानच्या गणेशमूर्ती दान उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. विसर्जन मिरवणुकीत तसेच घाटांवर पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांच्या नेतृत्वाखाली मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, खासगी संस्थांचे स्वयंसेवक, पोलीस मित्र झालेले महाविद्यालयीन विद्यार्थी आदींचा बंदोबस्त होता.
दरम्यान, चिंचवडच्या गणेश पेठेतील अष्टविनायक मंडळाने गणेशोत्सवावर लादल्या जाणाऱ्या विविध र्निबधाचा सूचक पद्धतीने निषेध केला.