शहरातील घनकचरा व्यवस्थापन सेवा सुरळीत ठेवण्याचे आव्हान पेलताना शहरातील कचरासेवकांची मोठी तारांबळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. करोना संसर्गामुळे उडालेली घबराट, गोंधळ आणि बंदमुळे कचरासेवकांच्या संचारावर आलेली बंधने, सोसायटय़ांनी दिलेले इशारे, अशा बिकट परिस्थितीमध्ये कचरादूतांना कचरा संकलनात अडथळे येत असल्याचे चित्र पुढे आले आहे.

शहरातील दैनंदिन स्वरूपात घरोघरी होणारा कचरा संकलित करण्यासाठी महापालिके ने स्वच्छ संस्थेसमवेत करार के ला आहे. शहराच्या ७५ टक्के  भागाला स्वच्छ सहकारी संस्थेकडून सेवा पुरविली जाते. घरोघरी जाऊन कचरावेचक कचरा संकलनाचे काम करत आहेत. या पाश्र्वभूमीवर शहरातील काही भागात कचरा संकलित होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शहरातील अनेक मोठे गृहप्रकल्प, सोसायटय़ांमध्ये कचरा साचून राहात असल्याचे चित्र आहे.

घराघरातील कचरा संकलित करण्यासाठी कचरा सेवकांना शहराच्या निरनिराळ्या भागात फिरावे लागते. सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली असून खासगी वाहने रस्त्यावर आणण्यास र्निबध घालण्यात आले आहेत. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कचरासेवकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बससेवा बंद असल्यामुळे अनेक कचरासेवकांना सकाळी कामावर पोहोचता आलेले नाही. काही ठिकाणी पोलिसांनीच कचरावेचकांना प्रवास करण्यास मनाई के ली आहे. संसर्गाच्या भीतीने काही सोसायटय़ा, गृहप्रकल्पांनी ३१ मार्चपर्यंत कचरा उचलण्यास येऊ नये, अशी सूचना के ली आहे, तर काही सोसायटय़ांनी दोन-तीन दिवसातून एकदाच येण्यास सांगितले आहे. संसर्गाच्या भीतीने कचरासेविकांना असंवेदनशीलपणे वागविले जात आहे, अशा स्वरूपाच्या तक्रारी कचरासेविकांनी के ल्या असल्याची माहिती स्वच्छ सहकारी संस्थेकडून देण्यात आली.

स्वच्छ संस्थेचे बहुतांश कर्मचारी कामावर

स्वच्छ संस्थेचे बहुतांश कर्मचारी कामावर जात आहेत. नियमांत होणारे बदल, शहर बंद यामुळे कचरा संकलनावर थोडा परिणाम झाला आहे. मात्र त्यावर पर्याय शोधण्याचे काम सुरू आहे. कचरावेचक कामावर आले नसतील तर ९७६५९९९५०० या क्रमांकावर संपर्क साधल्यास पर्यायी सेवा देण्यात येईल. मात्र स्वच्छ कचरासेवकांना घरटी मिळत असलेल्या शुल्कात कोणतीही कपात करण्यात येऊ नये. कचरा सेवकांना माहिती पत्रके  वाटण्यात आली असून सुरक्षा आणि स्वच्छतेसंबंधी प्रशिक्षण देण्यात आले आहे. कचरा निश्चितच संकलित होईल मात्र नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी, असे स्वच्छ संस्थेचे हर्षद बर्डे यांनी सांगितले.

कचरा सेवकांचे अनुभव

पीएमपीची सेवा बंद असल्यामुळे मला दोन दिवसांपूर्वी कामावर पोहोचता आले नाही. बिबवेवाडीहून स्वारगेटपर्यंत चालत जावे लागले. पुन्हा घरी येण्यासाठी चार तास प्रतीक्षा करावी लागल्याचे बिबवेवाडी येथील रामा तुपेरे यांनी सांगितले. खासगी वाहनांवर बंदी असल्यामुळे कचरा संकलित करता आला नाही, असे कोथरूड भागात काम करण्याऱ्या सुप्रिया भडकवाड यांनी नमूद के ले. संसर्गाच्या भीतीने काही सोसायटय़ांनी ३१ मार्चपर्यंत कचरा उचलण्यास मनाई के ल्याची आणि दोन-तीन दिसांत एकदाच कचरा उचलण्याची सूचना के ल्याची माहिती औंधमध्ये काम करणाऱ्या पिंकी सोनावणे यांनी दिली. नागरिक दरवाज्याच्या कडय़ा, कचऱ्याच्या बादल्या जंतुनाशकांनी स्वच्छ करत आहेत. मात्र वापरलेले मास्क व हातमोजे उघडपणे कचऱ्यात टाकत आहेत, असे निरीक्षण शिवाजीनगर भागातील

सरू वाघमारे यांनी नोंदविले. काही नागरिक कचरा हातात देण्याऐवजी लांबूनच गाडीत फे कतात, तर काहीजण तो रस्त्यावर टाकू न जातात, असे विद्या नाईकनवरे यांनी सांगितले.