महाविद्यालयांच्या आवारात अमली, तंबाखूजन्य पदार्थ आणले जाणार नाहीत आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या पदार्थाची विक्री होणार नाही, यासाठी महाविद्यालयांनी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने दिली आहे. याबाबत महाविद्यालयांच्या जवळ पानपट्टी असू नये अशा आशयाचा आदेश शासनानेही यापूर्वी दिला आहे. मात्र, प्रत्यक्षात पुण्यातील बहुतेक महाविद्यालयांच्या जवळ सिगारेट आणि पान-तंबाखूची विक्री होत आहे.
अमली पदार्थाच्या विक्रीला आळा घालण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी धोरण जाहीर केले होते. त्यानुसार शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अमलीपदार्थाची विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना सूचना दिल्या आहेत. ‘महाविद्यालयाच्या आवारात अमलीपदार्थाचे सेवन होणार नाही, त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अमलीपदार्थ विकण्यात येणार नाहीत, याची महाविद्यालयांनी काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात,’ अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत.
याबाबत महाराष्ट्र शासनानेही यापूर्वी आदेश काढले आहेत. त्यानुसार शाळा आणि महाविद्यालयांच्या जवळ पानटपरीला बंदी आहे. मात्र, तरीही पुण्यातील बहुतेक महाविद्यालयांजवळ पानटपऱ्या दिसून येतात. अनेक महाविद्यालयांच्या आवारातही धूम्रपानावरील बंदी कागदोपत्रीच राहिली आहे. परदेशी विद्यार्थ्यांकडून तर या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. या प्रश्नावर महाविद्यालयांकडून केली जाणारी उपाययोजनाही अजून जागृतीच्या स्तरावरच आहे.