21 October 2019

News Flash

हवामान खात्याच्या अंदाजातील महत्त्वाचे परिमाण आणि घटक..

पावसाचा अंदाज हा महत्त्वाचा असला तरी अंतिम शब्द मात्र नसतो.  पावसाच्या अंदाजाबाबत काही प्रश्नांचा घेतलेला वेध.

(संग्रहित छायाचित्र)

अंजली मरार

भारतीय हवामान विभागाने सोमवारी मोसमी पावसाबाबतचा पहिला अंदाज जाहीर केला. तो जून ते सप्टेंबर या पावसाच्या काळासाठी असतो. सरकार, उद्योग, सर्वसामान्य लोक यांना पावसाच्या या अंदाजाची नेहमीच प्रतीक्षा असते. आपली अर्थव्यवस्थाही या पावसावर अवलंबून असते. यंदाचा मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल असे स्कायमेट या खासगी संस्थेने म्हटले होते पण भारतीय हवामान विभागाने मोसमी पाऊस हा जवळपास सर्वसाधारण स्वरूपाचा म्हणजे दीर्घकालीन सरासरीच्या ९६ टक्के असेल असे म्हटले आहे. हा पावसाचा अंदाज हा महत्त्वाचा असला तरी अंतिम शब्द मात्र नसतो.  पावसाच्या अंदाजाबाबत काही प्रश्नांचा घेतलेला वेध.

* हवामान विभागाकडून अंदाजात  पावसाबाबत काय सांगितले जाते?

दीर्घ टप्प्याचा पहिला अंदाज भारतीय हवामान विभाग दरवर्षी एप्रिलमध्ये सादर करीत असतो त्यात देशात संपूर्ण मोसमात पावसाचे प्रमाण कसे राहील हे सांगितले जाते. यात प्रदेशनिहाय व महिन्यानुसार अंदाज दिला जात नाही. भारतात संपूर्ण मोसमात ८९ सें.मी पाऊस पडतो त्याला दीर्घकालीन सरासरी असे म्हणतात. एवढा पाऊस पडला की मोसमी पाऊस सुरळीत किंवा सरासरी इतका समजला जातो. जूनमध्ये पावसाचा दुसरा अंदाज दिला जातो त्यात प्रदेश व महिनानिहाय पावसाचा अंदाज वर्तवला जातो.

* खासगी संस्थेच्या अंदाजानुसार पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे, हा दावा कशाच्या आधारे करण्यात आला?

भारतातील मोसमी पाऊस हा प्रशांत महासागरातील स्थितीवर अवलंबून असतो. या महासागरातील पाणी नेहमीच्या पातळीपेक्षा थंड किंवा गरम होते तेव्हा त्याला एल निनो सदर्न ऑसिलेशन असे म्हणतात. त्याचा परिणाम वातावरणाच्या घटकांवर होतो. त्यामुळे जगातील हवामान बदलते. प्रशांत महासागरातील पाणी जर सर्वसाधारण पातळीपेक्षा जास्त गरम झाले तर त्याला एल निनो परिणाम म्हणतात व थंड झाले तर त्याला ला निना म्हणतात. एल निनोमुळे पावसावर विपरित परिणाम होतो तर ला निनामुळे पाऊस चांगला होतो. विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सौम्य एल निनो यावेळी आहे असे म्हटले जाते तो वाढत जाण्याची शक्यता आहे.

* एल निनो हा मोसमी पावसाचा एकमेव महत्त्वाचा घटक आहे काय?

नाही, मोसमी पावसावर अनेक घटकांचा परिणाम असतो त्यात स्थानिक, प्रादेशिक, जागतिक घटकांचा समावेश आहे. हिंदी महासागरातील सागरी प्रवाह, स्थानिक तापमान व हवेचा दाब, कमी दाबाच्या पट्टय़ांची निर्मिती, वाऱ्यांची अनुकूलता यांचा परिणाम पावसावर होत असतो.

सध्याच्या स्थितीत एल निनो हा महत्त्वाचा घटक आहे. नोव्हेंबर २०१८ व फेब्रुवारी २०१९ या काळात थंडीचा काळ नेहमीपेक्षा वेगळा होता. उत्तर, मध्य व पूर्व भागात काही दिवस हे जास्त थंडीचे होते. जागतिक पातळीवर हिवाळा टोकाचा होता व त्याचा संबंध आक्र्टिक कोल्ड ब्लास्टशी होता.

भारताच्या इतर  भागात उन्हाळ्याची चाहूल लागली असताना यंदा काश्मीरमध्ये हिमवृष्टी सुरू होती. त्यामुळे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणजे इराणवरून सुरू होऊन वायव्य भारतापर्यंत येणारे वारे हे जास्त होते त्यामुळे थंडीच्या एकूण स्थितीत भर पडत गेली.

* यंदा उन्हाळा नेहमीपेक्षा जास्त का जाणवत आहे?

या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय हवामान विभागाने उन्हाळा नेहमीपेक्षा तीव्र असण्याचे संकेत दिले होते. पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, हरयाणा,राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगण, आंध्रचा किनारी भाग, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली होती. गेल्या दोन वर्षांपेक्षा वेगळा कल यावेळी दिसत असून सौराष्ट्र, कच्छ. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या भागात मार्चच्या तिसऱ्या आठवडय़ातच उष्णतेच्या लाटा येऊन गेल्या आहेत. अजूनही तेथे उष्मा जास्त आहे.

* हे टोकाचे हवामान परिणाम एल निनोशी संबंधित म्हणायचे का?

थंडीच्या काळात अनेकदा पश्चिमी वाऱ्यांचे परिणाम जास्त जाणवले आहेत. त्याचा एल निनो निर्माण होत असल्याशी संबंध आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील हवामान स्थितीवर पश्चिमी वाऱ्यांचा परिणाम असतो.

* गेल्या वर्षीचा मोसमी पाऊस कसा होता?

गेल्यावर्षी म्हणजे २०१८ मध्ये मोसमी पाऊस हा सरासरीच्या नऊ टक्के कमी होता. त्यात प्रादेशिक पातळीवर कमी जास्त प्रमाण होते. वायव्य भारतात व दक्षिण द्वीपकल्पात पावसाची सरासरी दोन टक्केच कमी राहिली तर ईशान्य, पूर्व भारतात पाऊस सरासरीच्या २४ टक्के कमी होता. मणिपूर (- ५९ टक्के), मेघालय ( -४१ टक्के), अरूणाचल प्रदेश (-३२ टक्के), त्रिपुरा (-२१ टक्के), गुजरात व झारखंड (- २८ टक्के), बिहार (- २५ टक्के), पश्चिम बंगाल (-२० टक्के) हे भाग कोरडेच राहिले. महाराष्ट्रात मराठवाडा कोरडा राहिला तेथे ७९ टक्के पाऊस झाला.

First Published on April 16, 2019 1:12 am

Web Title: important dimensions and components in the forecast of the weather account