खून, दरोडे, लुटमारीतील आरोपी, त्याचप्रमाणे स्थानिक टोळ्यांमधील गुंडांकडून पोलिसांनी अनेकदा पिस्तूल जप्त केले आहेत. गुन्हेगारांकडे पिस्तूल सापडण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढलेले आहे, मात्र या पिस्तूल प्रामुख्याने भारतीय बनावटाच्या आहेत. पिस्तूल किंवा गावठी कट्टा ही हत्यारे स्थानिक गुंडांकडे सापडणे ही गंभीर बाब असली, तरी ती नित्याची होत असताना एका स्थानिक गुन्हेगाराकडे चक्क ‘इम्पोर्टेड पिस्टल’ सापडले आहे. तळहाताहूनही छोटे हे तीन लाख रुपये किमतीचे घातक हत्यार आहे.
शहर व शहरालगतच्या हद्दीमध्ये गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीने अभिलेखावरील गुन्हेगारांवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत असते. त्यांना गुन्हे करण्यापासून रोखण्यासाठी विविध उपाययोजनाही केल्या जातात. या गुन्हेगारांना जेरबंद करण्याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी सतिश निकम हे त्यांच्या पथकाच्या मदतीने सराईतांवर लक्ष ठेवून असताना खबऱ्याकडून त्यांना एक माहिती मिळाली. गुंड नीलेश घायवळ टोळीतील दीनकर शंकर तावरे ऊर्फ अण्णा हा गुन्हा करण्याच्या तयारीत असून, धायरी नऱ्हे रस्त्यावरील गोकुळनगरातील ओम यश हाईटस् या ठिकाणी थांबला असल्याची ही माहिती होती.
निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेगळे, कर्मचारी शैलेश जगताप, रुपेश वाघमारे, फिरोज बागवान, प्रसाद जंगीलवाड यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला व पळून जात असलेल्या तावरेला पकडले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे सापडलेल्या पिस्टलमुळे पोलिसांच्याही भुवया उंचावल्या. ब्राउनिंग कंपनीचे एक ‘इम्पोर्टेड पिस्टल’ त्याच्याकडे होते. स्थानिक गुंडांकडे सहसा असे हत्यार मिळत नसल्याने पोलिसांनी याबाबत तातडीने गुन्हा दाखल करून या पिस्टलबाबत त्याच्याकडे तपास सुरू केला आहे.
तावरे याच्याकडे सापडलेले पिस्टल कुणाचे हरवले असेल, चोरी झाले असेल किंवा या पिस्टलबाबत गुन्हा दाखल असल्यास शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनशी ९१५८४४५५५५, ९८२३९९९३७० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

‘‘गुन्हेगाराकडे सापडलेले पिस्टल विदेशातील आहे. ते आपल्या देशात असते, पण स्थानिक गुंडांकडे ते सापडत नाही. त्यामुळे त्याने कुणाचे तरी ते चोरले असावे किंवा हरवलेले पिस्टल त्याला मिळाले असल्याची शक्यता आहे. त्याबाबत तपास सुरू असून, या पिस्टलबाबत काही माहिती असल्यास ती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.’’
सतीश निकम (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट २)