News Flash

महिला उद्योजिकेचा फॅब्रिकेशन व्यवसायात ठसा

धायरी परिसरात ‘समृद्धी उद्योग’ हा स्वतचा फॅब्रिकेशनचा कारखाना सुरू करणाऱ्या सुप्रिया जगदाळे मात्र अशा नियमाला अपवाद ठरत आहेत.

पुरुषांचे क्षेत्र अशी ओळख असलेल्या फॅब्रिकेशन व्यवसायात सुप्रिया जगदाळे मेहनत आणि कौशल्याच्या बळावर आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत.

महिला आणि उद्योग हे समीकरण आता फारसे नवे नसले तरी रुळलेल्या वाटा सोडून वेगळ्या वाटेवरचा उद्योग व्यवसाय म्हणून स्वीकारताना आजही महिला दिसत नाहीत. धायरी परिसरात ‘समृद्धी उद्योग’ हा स्वतचा फॅब्रिकेशनचा कारखाना सुरू करणाऱ्या सुप्रिया जगदाळे मात्र अशा नियमाला अपवाद ठरत आहेत.

वाणिज्य शाखेतील पदवी घेतल्यानंतर सुप्रिया आणि राहुल जगदाळे यांचा विवाह झाला. यथावकाश दोन मुलींचा जन्म झाला. त्या शाळेत जाऊ लागल्या तेव्हा सुप्रिया यांना करीअरचे वेध लागले. इंजिनियर असलेल्या वडिलांचे काम पाहून आपणही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काही करावे असा विचार करत सुप्रिया यांनी फॅब्रिकेशन उद्योगात नशीब आजमावायचे ठरवले. शिकत, चाचपडत सुरू केलेल्या या व्यवसायाने आता तीन वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे.

सुप्रिया जगदाळे म्हणाल्या, वडिलांच्या मार्गदर्शनातून उभे राहिलेले फॅब्रिकेशन कारखान्यांचे काम पाहात होते. करीअर म्हणून मार्ग निवडण्याची वेळ आली तेव्हा फॅब्रिकेशनचा कारखाना सुरू करण्याचा विचार केला.

सुरुवातीला वडिलांनी इतर फॅब्रिकेशन व्यावसायिकांकडे मार्केटिंगचे काम करून व्यवसायाचे स्वरूप समजून घेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे काही काळ नोकरी केल्यानंतर मी आणि राहुल यांनी स्वतचा कारखाना उभा करण्याचे ठरवले. त्यासाठी दोघांनीही नोकरीतून कमावलेली गंगाजळी खर्च केली मात्र प्रत्यक्ष काम मिळाले तेव्हा कच्चा माल खरेदी करण्यासही पैसे नव्हते. त्यावेळी बँकेकडे कर्ज मागण्यास गेले आणि पंतप्रधान योजनेतून कर्ज मिळाले. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.

कारखान्यात फॅब्रिकेशन काम करणारे प्रशिक्षित कामगार ठेवणे शक्य होते, मात्र कामाचा दर्जा उत्तम राखायचा तर स्वतला सगळे काम आले पाहिजे यासाठी सुप्रिया वेल्डिंग, ग्राईडिंग, फिनिशिंग, डिझायनिंग आणि मार्केटिंग शिकल्या. शाळांसाठी लागणारी बाके, हॉस्टेलमध्ये लागणारे बंक बेड, कपाटे, फोल्डिंगचा झोपाळा, बागेतील घसरगुंडी, सी-सॉ सारखी खेळणी त्यांच्या कारखान्यात तयार होतात. आता कॉर्पोरेट उद्योगांच्या ऑर्डर घेण्याची, कारखान्यात महिलांना रोजगार संधी निर्माण करून देण्याची इच्छा सुप्रिया व्यक्त करतात. त्यासाठी तरुणी आणि महिलांना फॅब्रिकेशन शिकण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन (संपर्क- ९६५७५४४२१६) त्या करतात.

महिलांसाठी नावीन्यपूर्ण उत्पादने

नोकरी आणि संसार अशी तारेवरची कसरत सांभाळणाऱ्या महिलांना उपयुक्त ठरतील अशा कल्पनांबाबत विचार करून त्या अमलात आणण्याकडे सुप्रिया जगदाळे यांचा कटाक्ष आहे. याच विचारातून त्यांनी गौरी-गणपतीच्या काळात गौरींच्या नैवेद्यासाठी तयार केलेल्या खाद्यपदार्थाची कलात्मक सजावट करण्यासाठी विशेष स्टँड तयार केला आहे. महिलांनी या स्टँडला भरपूर पसंती दिली असून दरवर्षी उत्सवाच्या काळात तीनशे ते चारशे स्टँडची विक्री होत असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 1:11 am

Web Title: impression of women entrepreneurs fabrication business
Next Stories
1 पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकाच अ‍ॅपवर येणार
2 थंडीचा राज्यभर कहर!
3 शिक्षक भरतीची जाहिरात न निघाल्यास शिक्षकांचा आत्मदहन करण्याचा इशारा
Just Now!
X