पालकांची बदलती मानसिकता आणि पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा परिणाम

भक्ती बिसुरे, लोकसत्ता

पुणे : करोना महामारीचे वर्ष म्हणून पुणे शहराला वेठीस धरलेले २०२० हे वर्ष एका बाबतीत मात्र अत्यंत सकारात्मक वर्ष ठरले. तब्बल पाच वर्षांनंतर २०२० मध्ये शहरात १००० मुलांमागे ९४६ मुलींचा जन्म झाला. नव्या पालकांची बदलती मानसिकता आणि पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यांमुळेच हे शक्य झाले आहे.

२०१६ ते २०२० या पाच वर्षांत १००० मुलांमागे सर्वाधिक ९४६ मुलींचा जन्म २०२० मध्ये झाला आहे. २०१६ मध्ये पुणे शहरात ९३२ मुली जन्माला आल्या. त्यानंतर २०१७, २०१८ आणि २०१९ या तिन्ही वर्षी शहरात जन्मलेल्या मुलींच्या संख्येत घटच झालेली पाहायला मिळाली. २०१७ मध्ये ९२७, २०१८ मध्ये ९२८ आणि २०१९ मध्ये ९०४ एवढी घट लिंग गुणोत्तरात दिसून आली. मात्र, २०२० मध्ये तब्बल ९४६ घरांमध्ये मुलींचे स्वागत करण्यात आले आहे.

पुणे महापालिके च्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळिवंत म्हणाल्या, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हे एक कारण आहेच, त्याबरोबर याबाबत जनजागृतीलाही विशेष महत्त्व आहे. हे ओळखून आम्ही आई-बाबा होणाऱ्या जोडप्यांचे समुपदेशन करण्याला महत्त्व देत आहोत. सरकारी कार्यालये, पोलीस कर्मचारी, कॉर्पोरेट्स अशा विविध ठिकाणी काम करणाऱ्या, विवाहित महिला आणि पुरुषांशी संवाद साधून मूल जन्माला घालताना मुलगा किं वा मुलगी असा भेदभाव न करण्याविषयी समुपदेशन के ले जाते. यंदाच्या वर्षीही हे समुपदेशनाचे काम आणि पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी या दोन्ही गोष्टी एकत्रित राबवून मुलींचा जन्मदर आणखी उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट के ले.

महिलेचे मन वळवणे अवघड

विवाहित महिला आणि पुरुष यांचे समुपदेशन हे मुलींचा जन्मदर वाढवण्यामागे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. हे करताना सहसा महिलेलाच मुलगा हवा अशी सुप्त इच्छा असते, हे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळे मुलीच्या जन्माला विरोध नको, यासाठी पुरुषापेक्षा महिलेचे मन वळवणे जास्त महत्त्वाचे आणि अवघड असते, अशी खंत ही डॉ. कल्पना बळिवंत यांनी बोलून दाखवली.

कन्यांची संख्या

वर्ष       लिंग  गुणोत्तर

२०१६          ९३२

२०१७         ९२६

२०१८         ९२८

२०१९         ९०४

२०२०         ९४६