20 January 2019

News Flash

पं. भीमसेन जोशी कलामंदिर उद्यापासून रसिकांच्या सेवेत..

औंध, बाणेर, पाषाण, सूस, बालेवाडी, िहजवडी या परिसरातील नाटय़प्रेमींसाठी भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलामंदिराचा (नाटय़गृह) उद्घाटन समारंभ रविवारी (२ जून) होत असून मुख्यमंत्री

| June 1, 2013 02:50 am

 औंध, बाणेर, पाषाण, सूस, बालेवाडी, िहजवडी या परिसरातील नाटय़प्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलामंदिराचा (नाटय़गृह) उद्घाटन समारंभ रविवारी (२ जून) होत असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पाचशे आसनक्षमता असलेले औंध येथील हे नाटय़गृह लगेचच रसिकांच्या सेवेत रुजू होईल.
किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना भारतरत्न किताब जाहीर झाल्यानंतर त्यांचा सन्मान करण्यासाठी या नाटय़गृहाला पं. भीमसेन जोशी यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पाचशे प्रेक्षक नाटकाचा आनंद लुटू शकतील असे नाटय़गृह आणि उत्कृष्ट दर्जाचे कलादालन असे या नाटय़गृहाचे स्वरूप आहे. नाटय़गृहाजवळच महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन उभारण्यात आले असून या दोन्ही योजनांसाठी मिळून वीस कोटी रुपये खर्च आला आहे. उद्घाटन समारंभात महापौर वैशाली बनकर तसेच महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असेल, असे स्थानिक नगरसेविका संगीता गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.
विस्तारणाऱ्या पुणे शहरातील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी उपनगरांमध्येही नाटय़गृह, उद्याने यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, अशी मागणी सातत्याने होत होती. ही बाब ध्यानात घेऊन कोथरूड येथे नाटय़गृह उभारण्यात आले आणि या नाटय़गृहाला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले. कोथरूडनंतर म्हाळुंगे-बालेवाडी येथे क्रीडानगरी विकसित झाली तसेच िहजवडी येथे आयटी पार्क विकसित झाले. त्यामुळे बालेवाडी, हिंजवडीबरोबरच औंध, बाणेर आणि पुणे विद्यापीठ परिसराचाही झपाटय़ाने विकास झाला.
 हा विकास लक्षात घेऊन येथील नागरिकांसाठी औंध येथे नाटय़गृह उभारण्यासाठीचे प्रयत्न तत्कालीन महापौर दत्ता गायकवाड यांनी २००१ मध्ये सुरू केले होते. महापौरपदाच्या कारकिर्दीतच गायकवाड यांनी या नाटय़गृहाचे भूमिपूजन केले होते. मध्यंतरी काही काळ रखडलेले हे काम आता पूर्णत्वास गेले असून या नाटय़गृहाचे, कलादालनाचे आणि उद्योग भवनाचे उद्घाटन रविवारी होत आहे.
महापालिकेचे पाचवे नाटय़गृह
महापालिकेतर्फे औंध येथे बांधण्यात आलेले पं. भीमसेन जोशी कलामंदिर हे शहरातील पाचवे नाटय़गृह आहे. शहरात आतापर्यंत बालगंधर्व रंगमंदिर (आसनक्षमता- ९९०), गणेश कला क्रीडा मंच (आसनक्षमता- २,५००), यशवंतराव चव्हाण नाटय़गृह (आसनक्षमता- ८९३) आणि  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (आसनक्षमता- ४००) ही चार नाटय़गृह बांधण्यात आली आहेत.

First Published on June 1, 2013 2:50 am

Web Title: in aundh from 2nd june pd bhimsen joshi kalamandir will be in service
टॅग Aundh