औंध रूग्णालयात बर्न वॉर्ड, हृदय रोग तसेच कर्करोगावर उपचार करणारा विभाग सुरू करण्याचा मानस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. रूग्णालयातील क्षयरोग विभाग अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी होत असल्याचे सांगत यासंदर्भात आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
औंध रूग्णालयात अद्ययावत अतिदक्षता विभाग, डायलेसिस विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्र, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण केंद्र व सुसज्ज वसतिगृहाचे भूमिपूजन अजितदादांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. या वेळी आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेवक प्रशांत शितोळे, अजय शितोळे, शत्रुघ्न काटे, मयूर कलाटे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, केंद्र व राज्य सरकारचा आरोग्यासाठी जास्तीचा निधी देण्याचा आग्रह असतो. सुदैवाने अर्थखाते माझ्याकडे आहे. खासगी रूग्णालयांचे दर सामान्यांना परवडत नसल्याने शासकीय रूग्णालये त्यांना आधार वाटतात. अशा ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असाव्यात, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्या हेतूने ‘राजीव गांधी जीवनदायी योजना’ सुरू करण्यात आली, त्यात काही त्रुटी असल्यास त्या दूर केल्या जातील. औंध रूग्णालयासाठी दिलीप वळसे पाटील यांनी ६५ कोटींचा निधी यापूर्वी मंजूर केला आहे. आमदार जगताप यांचा सातत्याने कटाक्ष असतो. आपणही वरच्यावर या ठिकाणी भेट देत असतो. राज्यातील प्रत्येक विभागात कर्करोग रूग्णालय हवे आहे. मात्र, त्यासाठी तरतूद करावी लागणार आहे.
..आणि अजितदादा भडकले!
प्रसूतिसाठी रूग्णालयात आलेल्या महिलेच्या नवजात मुलाचा मृत्यू होण्याची घटना अजितदादा येण्यापूर्वी तासभर आधी घडली, तिच्या नातेवाइकांनी डॉक्टरांचा  हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला. अजितदादांचे भाषण सुरू असताना एकाने मध्येच बोलून हा प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अजितदादा भडकले आणि त्यास बाहेर हाकलण्यात आले. मात्र, कार्यक्रम संपल्यावर पुन्हा बोलावून घेत झाल्या प्रकाराची माहिती घेतली. दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी रूग्णालय व्यवस्थापनाला दिले आणि योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन नातेवाइकांना दिले.