देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. तेव्हापासून अघोषित आणीबाणी सुरू झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगीत ते पत्रकारांशी बोलत होते. अहमदनगर येथे भाजपा-राष्ट्रवादीची युती हा अपघात असून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले.

ते म्हणाले, भीम आर्मीचे प्रमूख चंद्रशेखर आझाद यांना डांबणे आणि त्यांना फिरण्यास मज्जाव करणे ही आणीबाणीच आहे. अशा पद्धतीने पददलितांना दाबून त्यांना कोंडून ठेऊन जर तुम्ही राज्य करणार असाल तर महाराष्ट्रातील आणि देशातील जनता हे सहन करणार नाही. २०१९ ला त्याचे परिणाम दिसून येतील, असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्री फडणवीस हे जळगावला गेल्यानंतर धर्मा पाटील यांच्या पत्नीला पोलीस ठाण्यात नजकैदेत, हे काय सुरू आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी अहमदनगर महापालिकेतील भाजपा-राष्ट्रवादी युतीवर भाष्य केले. अहमदनगर येथे झालेली भाजपा राष्ट्रवादीची युती ही अपघात आहे. स्थानिक नेत्यांना सांगूनही त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. त्यांच्यावर योग्य ती कारवाई पक्ष करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपा-शिवसेनेला सहकार्य करायचे नाही, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. स्थानिक नेत्यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाला मान्य नाही. त्यामुळे याचा राष्ट्रवादी निषेध करत असल्याचे ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर युती करायची आहे. पण त्यावर अद्याप चर्चा सुरू आहे. चर्चा संपल्यानंतर योग्य निष्कर्ष कळेल. आमची अपेक्षा आहे की, भाजपा आणि शिवसेनेला पराभूत करणाऱ्या सर्व पक्षांना एकत्रित करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.