29 September 2020

News Flash

मान्सून काळात देशात १०५ टक्के पाऊस

सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या काळात इतका दमदार पाऊस पडला की त्यावेळी आताचे वर्ष अतिवृष्टीचे ठरणार, अशीच चिन्हे होती. त्यानंतर मात्र पावसाचे प्रमाण कमी झाले आणि ही

| October 1, 2013 02:44 am

मान्सूनने चार महिन्यांचा काळ पूर्ण केला असून, या काळात देशात सरासरीच्या १०५ टक्के पाऊस पडला आहे. महाराष्ट्रातही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ अशा चारही उपविभागांमध्ये त्याने सरासरी ओलांडून समाधानकारक हजेरी लावली.
मान्सूनचा अधिकृत चार महिन्यांचा काळ (जून ते सप्टेंबर) सोमवारी संपला. या काळात देशात पावसाने अनेक चढउतार पाहिले. सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या काळात इतका दमदार पाऊस पडला की त्यावेळी आताचे वर्ष अतिवृष्टीचे ठरणार, अशीच चिन्हे होती. पहिले दोन महिने पावसाची आकडेवारी सरासरीच्या तुलनेत तब्बल ११७-११८ टक्क्य़ांपर्यंत वाढली होती. त्यानंतर मात्र पावसाचे प्रमाण कमी झाले आणि ही सरीसरी खाली आली. विशेषत: ईशान्य भारत आणि पूर्व भारतात पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे देशाच्या एकूण पावसावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे १ जून ते ३० सप्टेंबर या काळात देशभरात एकूण सुमारे ९३१ मिलिमीटर पाऊस पडला. तो मान्सून काळातील सरासरी पावसाच्या तुलनेत १०५ टक्के आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
देशातील हवामानाच्या ३६ उपविभागांपैकी १४ उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा १० टक्के जास्त पाऊस झाला. १६ उपविभागांमध्ये सरासरीइतका पाऊस झाला आहे. या सरासरीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पावसाचे एकूण क्षेत्र देशाच्या क्षेत्राच्या तुलनेत तब्बल ८६ टक्के आहे. उरलेल्या १४ टक्के क्षेत्रावर अपुरा पाऊस (सरासरीच्या १० टक्के कमी) पडला आहे. त्यात ईशान्य भारतातील तीन उपविभाग, तसेच, बिहार, झारखंड आणि हरयाणा या सहा उपविभागांचा समावेश आहे.
विदर्भात १४३ टक्के पाऊस
महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांच्या अपुऱ्या पावसाच्या पाश्र्वभूमीवर या मान्सून हंगामात उत्तम पाऊस पडला. ज्या भागात पहिल्या दोन-तीन महिन्यांमध्ये अपुरा पाऊस पडला, तिथली सरासरी पावसाच्या शेवटच्या महिन्यात (सप्टेंबर) पडलेल्या पावसाने भरून काढली. कोकणात चार महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा १२० टक्के पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र (१२१ टक्के), मराठवाडा (११० टक्के) आणि विदर्भातही (१४३ टक्के) पावसाने चांगली हजेरी लावली.
हवामान विभागाचे पावसाचे अधिकृत चार महिने (जून ते सप्टेंबर) संपले असले तरी मान्सून अद्याप देशातून माघारी परतलेला नाही. तो राजस्थान, गुजरात आणि पंजाबच्या काही भागातून परतला आहे. मात्र, पुढील भागातून तो अद्याप बाहेर पडलेला नाही. त्याच्या परतीच्या प्रवासाला या वर्षी बराच विलंब झाला आहे. साधारणत: १ ऑक्टोबरला तो निम्म्या भारतातून परतलेला असतो. महाराष्ट्राच्या निम्म्या भागातूनही तो निघून गेलेला असतो. यंदा मात्र तो इथपर्यंत पोहोचलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 2:44 am

Web Title: in monsoon 105 rain in country
टॅग Monsoon
Next Stories
1 हिंजवडीत थरारनाटय़; तीन आरोपी गजाआड
2 तिशीतच वाढतोय हृदयरोगाचा धोका!
3 शाळांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षण विभागाचा नवा उपाय –
Just Now!
X