22 November 2017

News Flash

पंढरपूरमध्ये भीमा नदीत पती-पत्नी गेले वाहून

उजनी धरणातून ४० हजार क्युसेक्सचा विसर्ग भीमा नदीत सोडला आहे.

पुणे | Updated: September 14, 2017 10:33 PM

मुंढेवाडीच्या (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याच पुलावरून दाम्पत्य वाहून गेले.

सोलापूर जिल्ह्यातील मुंढेवाडी ते अजनसोंड दरम्यान भीमा नदीवर असलेल्या बंधार्‍यावरून निघालेले पती-पत्नी वाहून गेले आहेत. ही घटना गुरूवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली असून पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे. सुरेश विष्णू बनकर आणि वंदना सुरेश बनकर असे वाहून गेलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

उजनी धरणातून ४० हजार क्युसेक्सचा विसर्ग भीमा नदीत सोडला असल्यामुळे भीमा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. मुंढेवाडी येथील बंधार्‍यावर सुमारे दीड ते दोन फूट पाणी असतानाही सुरेश आणि वंदना बनकर हे पती-पत्नी मोटारसायकलवरून नदी पार करण्याच्या प्रयत्नात असताना वाहून गेले.

बनकर दाम्पत्य कडलास रोड सांगोला येथील रहिवासी आहेत. फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील वंदना यांच्या आजारी मावशीला भेटण्यासाठी ते दोघे गेले होते. तेथून परत येत असताना अनवली (ता. पंढरपूर) येथील वंदनांच्या माहेरी मुक्काम करण्याच्या हेतूने भीमा नदीवरील मुंढेवाडीच्या बंधाऱ्यावरून येताना ते वाहून गेले.

अजनसोंडच्या बाजूने मुंढेवाडी येथील बंधार्‍यावर आल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या स्थानिक लोकांनी त्यांना बंधार्‍यावरून पाणी वाहत असून पाण्याला वेग आहे. त्यामुळे तुम्ही जाऊ नका अशी सूचना केली होती. मात्र आम्हाला अनवली येथे तातडीने जायचे आहे असे सांगून बंधाऱ्यावरून जाण्यासाठी मोटारसायकल तशीच पुढे दामटली. बंधार्‍यावर थोडे पुढे गेल्यानंतर पाण्याच्या वेगामुळे मोटारसायकलसह दोघेही जण वाहून गेल्याचे प्रत्यक्ष घटना पाहणार्‍या लोकांनी सांगितले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पंढरपूर तालुका पोलीस आणि महसूल विभागाकडे संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली तर महसूल विभागाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली आहे.

First Published on September 14, 2017 10:33 pm

Web Title: in pandharpur husband and wife have gone in the bhima river