पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र अद्याप सुरूच आहे. थेरगावमध्ये २० ते २५ वाहनांची तोडफोड करत समाजकंटकांनी हातात कोयते घेऊन वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवून भीतीचे वातावरण निर्माण केले होते. तीन अज्ञातांपैकी एक जण नागरिकांच्या हाती लागला. त्याला चोप देऊन वाकड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही घटना बुधवारी रात्री बाराच्या सुमारास थेरगाव येथे घडली. याप्रकरणी महेश मुरलीधर तारू (वय ४३, रा.नखाते नगर, थेरगाव) यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून (एमएच १४ ए एफ-४६०१) तीन अज्ञात व्यक्ती आरडाओरडा करत हातात कोयते घेऊन आले. त्यांनी अचानक रस्त्यावरील गाड्यांची तोडफोड सुरू केली. फिर्यादी महेश तारू हे अडवण्यासाठी गेले. त्यावेळी दुचाकीवरील एकाने त्यांना कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील एक हजार रुपये काढून घेतले. तसेच पुढे जाऊन धनगरबाबा मंदिर, नखाते नगर, नम्रता हौसिंग सोसायटी येथील गाड्यांची तोडफोड केली. यात तीन चाकी, चारचाकी आणि दुचाकींचा समावेश आहे. अशा एकूण २० ते २५ वाहनांची तोडफोड केली. वाहनांचे नुकसान आणि दहशत यामुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण झाले आहेत. त्यात पोलीस या घटना रोखण्यात अपयशी ठरत आहेत. अशातच संतप्त नागरिकांनी या समाजकंटकांचा पाठलाग केला अन एकाला पकडून चांगलाच चोप दिला. इतर मात्र दुचाकीवरून पसार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू आहे. दुचाकीवरील अज्ञाताचा पाठलाग करतानाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याआधारे अज्ञात समाजकंटकांचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.