उद्योग नगरी पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला असून, एकूण बाधित रुग्णांची संख्या ५० हजार २९६ वर पोहचली आहे. पैकी, पिंपरी-चिंचवड शहरातील ३५ हजार ४१५ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत.  तर आत्तापर्यंत शहरातील ८६७ आणि महानगर पालिकेच्या हद्दीबाहेर मात्र पालिका प्रशासनाच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १९१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९८५ करोनाबाधित रुग्ण आढळले असून, १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ६३० जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या  ५ हजार ५८२ एवढी आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मार्च महिन्यात पहिला करोना बाधित रुग्ण आढळला होता. तेव्हापासून शहरात करोना महामारीने पायमुळं पसरवली असून, करोना बाधित रुग्णांचा आकडा ५० हजारांच्या पुढे पोहचला आहे. दरम्यान, ही चिंतेची बाब असली तरी करोनातून बरे होण्याचे प्रमाण देखील शहरात उल्लेखनीय आहे. आत्तापर्यंत ३५ हजारांपेक्षा अधिक जण करोनातून बरे झाले आहेत.  गेल्या चार ते पाच महिन्यांपासून शहरातील व्यवसाय, मुख्य बाजारपेठा, मॉल्स, सर्व बंद होते. लॉकडाउन जाहीर केल्यानंतर नागरिकांनी देखील प्रशासनाला चांगला प्रतिसाद दिला होता. कंटेन्मेंट झोन करण्यात आले. करोना आळा बसेल यासाठी प्रत्येकासह कोरोना योद्ध्यांनी योगदान दिले. या सर्वांना काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. सध्या महानगरपालिकेन एक जम्बो कोविड सेंटर उभारले असून, पिंपरी ऑटो क्लस्टर येथे देखील अद्यावत सुविधा असणारे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन पार पडले आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने नियमांचे काटेकोरपणे करत, स्वतः बाबतची सुरक्षितता बाळगली तर करोना विषाणू संसर्ग टळू शकतो.

“जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करणे हाच उद्देश आहे. त्यांना आयसोलेट करायचं. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य वाचवणं महत्वाचं आहे. वयोवृद्ध नागरिकांची जास्तीत जास्त तपासणी केली जात आहे. नागरिकांना आवाहन आहे की, करोना आपल्यातून गेलेला नाही अजून वाढ होत आहे. नियमांचे पालन करून स्वतः ची काळजी घ्या. सोशल डिस्टसिंग आणि मास्क प्रत्येक नागरिकाने वापरावे. गणेशोत्सवात नागरिकांनी खूप चांगलं सहकार्य केल आहे. कुठेही गर्दी न करता घरातच गणपती विसर्जन केले. असंच सहकार्य भविष्यात अपेक्षित आहे. जम्बो कोविड सेंटर उभारले आहे, कोणतीही सुविधा कमी पडणार नाही. काही लक्षण आढळल्यास कोविड टेस्ट करावी.” असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त, श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.