पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १,५०६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५५ हजार ७६१ झाली आहे. तर दिवसभरात २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर १ हजार ३३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १,७९१ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ३६ हजार ९१४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

तर, पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी दिवसभरात ९०३ जण करोनाबाधित रुग्ण आढळले असून १८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पहिल्यांदाच शहरातील २ हजार १०७ जण एका दिवसात करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ६३ वर पोहचली असून यांपैकी, १४ हजार ६८२ जण करोनामुक्त झालेले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

महाराष्ट्रात २४ तासांत १० हजार ७२५ रुग्ण बरे

महाराष्ट्रात मागील २४ तासात १० हजार ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत २ लाख ६६ हजार ८८३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१.८२ टक्के इतकं झालं आहे. राज्यात ९ हजार ६०१ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात ३२२ करोना बाधितांचा मृत्यू मागील २४ तासांमध्ये झाला आहे. तर राज्यातील मृत्यू दर ३.५५ टक्के झाला आहे.