देशभरासह राज्यातील करोनाबाधितांची संख्या अद्यापही वाढत आहे. राज्यात पुणे शहर हे करोनाबाधितांच्या संख्येत अग्रस्थानी आहे. पुणे शहरात आज दिवसभरात तब्बल १ हजार ६९५ नवे करोनाबाधित आढळले. तर, २८ रुग्णांचा मृत्यू झाला. करोनाबाधितांच्या संख्येत पुण्याने दिल्ली, मुंबई या दोन्ही शहरांना मागे टाकले आहे.

याचबरोबर पुण्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ९७ हजार ६८ वर पोहचली आहे. आज अखेर २ हजार ३३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ४१९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना आज घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत एकूण ७९ हजार ४८९ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

उद्योग नगरी पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला असून, एकूण बाधित रुग्णांची संख्या ५० हजार २९६ वर पोहचली आहे. पैकी, पिंपरी-चिंचवड शहरातील ३५ हजार ४१५ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. तर आत्तापर्यंत शहरातील ८६७ आणि महानगर पालिकेच्या हद्दीबाहेर मात्र पालिका प्रशासनाच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १९१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९८५ करोनाबाधित रुग्ण आढळले असून, १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ६३० जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ५८२ एवढी आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.