पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १०९१ रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या ७० हजार ३२६ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आज अखेर १ हजार ६५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ११५६ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ५३ हजार ९५८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

तर पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९४६ करोनाबाधित रुग्ण आढळले असून यांपैकी २४ रुग्ण हे महापालिकेच्या हद्दीबाहेरील आहेत. तर २० जणांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३२ हजार ५६५ वर पोहचली आहे. यांपैकी, २२ हजार ४५३ जण करोनामुक्त झाले आहेत. तसेच दिवसभरात ४४८ जण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आत्तापर्यंत ६६३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात शहरी आणि ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे. महापालिकेच्या रुग्णालयात ५ हजार ८५३ सक्रिय रुग्ण संख्या आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.