करोनाचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात अद्यापही वाढत आहे. करोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणात आता पुण्याने मुंबईला मागे टाकले आहे. पुण्यात आज (शुक्रवार) ३५ रुग्णांचा मृत्यू झाला तर, १ हजार ५५६ नवे करोनाबाधित आढळले आहेत. याचबरोबर करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८० हजार ५९३ वर पोहचली आहे.

आजअखेर १ हजार ९१७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ५७० रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ६३ हजार ९१९ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १ हजार ८२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून २० जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या ४० हजारांच्या उंबरठ्यावर पोहचली असून ३९ हजार ८५९ वर पोहचली आहे. तर, ४५० जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २६ हजार २२० जण करोनामुक्त झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात सध्या ६ हजार ९५४ अॅक्टिव्ह रुग्ण संख्या आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

महाराष्ट्रात १४ हजार १६१ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासात ३३९ मृत्यूंची नोंद झाली आहे. दरम्यान मागील २४ तासात ११ हजार ७४९ रुग्ण करोनातून मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ४ लाख ७० हजार ८७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार ५६२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत करोनामुळे २१ हजार ६९८ रुग्णांचा महाराष्ट्रात मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही मााहिती दिली आहे.