पुणे शहरात आज दिवसभरात १ हजार ५५ नवे करोनाबाधित आढळले. तर, ३८ रुग्णांचा मृत्यू झाला. आज अखेर शहरात ३ हजार ६०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार २८६ रुग्णांची तब्येत ठीक झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आज अखेर १ लाख २८ हजार ९२५ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ५९८ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून,२२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, ८१६ जण आज करोनातून मुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७९ हजार ९३६ वर पोहचली असून यापैकी, ६७ हजार ८०६ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ४६६ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. दिवसभरात राज्यात १६ हजार ८३५ रूग्णांनी करोनावर मात केली असून करोनामुक्त झालेल्यांची संख्या ११ लाखांच्या वर पोहोचली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढणारी करोनाबाधितांची संख्या आता काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे. दिवसभरात राज्यात १४ हजार ३४८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २७८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे चोवीस तासांमध्ये राज्यात १६ हजार ८३५ जणांनी करोनावर मात केली असून आता राज्यातील करोनामुक्त झालेल्यांची संख्या ११ लाख ३४ हजार ५५५ इतकी झाली आहे.