पुणे शहरात आज दिवसभरात १ हजार ७०० नवे करोनाबाधित आढळल्याने, शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ३१ हजार ७८१ झाली आहे. तर आज दिवसभरात ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजअखेर ३ हजार ८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ५४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख १० हजार ९१६ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील करोनाबाधितांच्या संख्येने ७० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आज ७४९ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून ११ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, १ हजार १५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधितांच्या संख्येने आता ७० हजारांचा टप्पा ओलांडला असून एकूण संख्या ७० हजार १७२ वर पोहचली आहे. यापैकी, ५६ हजार ९९ जण करोनातून बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ३७५ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही झपाट्याने वाढत आहे. मागील चोवीस तासांमध्ये राज्यभरात २० हजार ५९८ नवे करोनाबाधित आढळले. तर, ४५५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १२ लाख ८ हजार ६४२ वर पोहचली आहे. एकीकीकडे करोना रुग्ण वाढत असताना करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. चोवीस तासांत राज्यभरात २६ हजार ४०८ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.राज्याचा रिकव्हरी रेट ७३.७१ टक्क्यांवर पोहचला आहे.