पुणे शहरात आज दिवसभरात १ हजार ३३६ नवे करोनाबाधित आढळले असून, ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ४५ हजार २९१ झाली आहे. आज अखेर ३ हजार ४८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ४३१ रुग्णांची तब्येत ठीक झाल्याने सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर १ लाख २५ हजार २६० रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये आज दिवसभरात ७६४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून, १७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ८२७ जण आज करोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८ हजार ८१ वर पोहचली असून यापैकी ६५ हजार १३ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ५५९ आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्याप वाढत असला तरी देखील, करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त निघाली आहे. राज्यभरात आज १८ हजार ३१७ नवे करोनाबाधित आढळले, तर १९ हजार १६३ जणांनी करोनावर मात केली आहे. याचबरोबर आज ४८१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ७८.६१ वर पोहचला आहे.

राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १३ लाख ८४ हजार ४४६ वर पोहचली आहे. ज्यामध्ये २ लाख ५९ हजार ३३ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले १० लाख ८८ हजार ३२२ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३६ हजार ६६२ जणांच्या संख्येचा समावेश आहे.