पुणे शहरात आज दिवसभरात १ हजार ४० नवे करोनाबाधित आढळले असून, ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ९९५ झाली आहे. आज अखेर ३ हजार ४४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ५४८ रुग्णांची तब्येत ठीक झाल्याने सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर १ लाख २३ हजार ८२९ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये आज दिवसभरात ६८४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून, २१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ८०६ जण आज करोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७७ हजार ३१७ वर पोहचली असून यापैकी ६४ हजार २८४ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ६८३ आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढते आहे ही बाब समोर येत असतानाच महाराष्ट्राला सलग दुसऱ्या दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये १९ हजार २१२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर १४ हजार ९७६ नवे करोनाबाधित मागील २४ तासांमध्ये आढळले आहेत. कालही करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. आत्तापर्यंत राज्यात १० लाख ६९ हजार १५९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. ज्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७८.२६ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.